वडील, मुलासह भाच्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू, पोळ्यालाच घडली दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुवाधार झालेल्या पावसामुळे वडवणी तालुक्यातील नदीला पूर आला आहे. पिंपरखेड येथील नदीला आलेल्या पुरामध्ये तिघे जण वाहून गेले होते. यातील दोघांचा मृतदेह देवडीच्या बंधाऱ्यात सापडला, तर एकाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. ही दुर्देवी घटना सोमवारी दुपारीच्या दोनच्या सुमारास घडली. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपरखेड येथील नदीला जोरदार पावसामुळे पूर आला होता. या पुराच्या पाण्यामध्ये अजय मधुकर खळगे (23) आणि भाचा अजय यादव उजगरे (21) हे वाहून जात असताना मधुकरराव खळगे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवास जास्त असल्याने मुलगा अजय आणि भाचा अजय हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.

मधुकर खळगे हे पाण्यात अडकले. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र पुराच्या पाण्यातील भोवऱ्यामध्ये अडकल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. त्यांना रूग्णालयामध्ये घेवून गेले असताना त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती कळताच तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम तातडीने करण्यात आले.