
दिल्ली विमानतळावर 7 महागड्या घड्याळांची तस्करी केल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तिला अटक केली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले एक घड्याळ सोन्याचे असून ते हिरेजडीत आहे. या घड्याळाची किंमत 27.09 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील सीमाशुल्क आयुक्त झुबेर रियाझ कामी यांनी सांगितले की, मूल्याच्या दृष्टीने व्यावसायिक किंवा महागड्या वस्तूंची केलेली ही सर्वात मोठी जप्ती आहे. तसेच किमतीचा विचार करता या घड्याळाची जप्ती म्हणजे ‘एकाच वेळी 60 किलो सोने जप्त करण्यासारखे आहे.’
या घटनेबाबत मंगळवारी दुबईहून दिल्ली आलेल्या एका आरोपी प्रवाशाला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असून हा आरोपी हिंदुस्थानचा नागरिक आहे. त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता त्याच्याकडून सात अतिशय महागडी मनगटी घडळे जप्त करण्यात आली, अशी माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही घड्याळे जेकब अँड कंपनी, पियाजे लाइमलाइट स्टेला, रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेट जस्ट, रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेट जस्ट, रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेट जस्ट आणि रोलेक्स ऑयस्टर पर्पेच्युअल डेट जस्ट. यापैकी एका जेकब अँड कंपनीच्या घड्याळाची किंमत 27 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्लीतील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घड्याळांव्यतिरिक्त, प्रवाशाकडून 28 कोटी किमतीचे हिऱ्यांनी जडलेले सोन्याचे ब्रेसलेट आणि एक आयफोनदेखील जप्त करण्यात आले आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली असून एका वरिष्ठ सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी प्रवासी गुजरातचा असून त्याच्या काकांचे दुबईमध्ये महागड्या घड्याळांचे शोरूम आहे. ज्याच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये इतर ठिकाणी शाखा आहेत. एका ग्राहकापर्यंत ही घड्याळे पोहोचवण्यासाठी तो ती दिल्लीला घेऊन जात होता. हा प्रवासी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या ग्राहकाला भेटणार होता, पण तो ग्राहकाला भेटायला गेलाच नाही. शिवाय आतापर्यंत या प्रवाशाने ग्राहकाचे नावही उघड केलेले नाही, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिल्ली सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त सुरजित भुजबळ या घटनेबाबत म्हणाले की, ‘दिल्ली विमानतळावरील सतर्क कस्टम अधिकार्यांनी वाहतुकीचा प्रचंड दबाव असतानाही ही जप्ती केली. ‘
























































