
येथील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक 4 वारंवार ओव्हरफ्लो होत असल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. शनिवारी (23 रोजी) दुपारी चार वाजता पंप हाऊसमधील वीजप्रवाहामध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे कालवा ओव्हरफ्लो झाल्याने पाणी शेतात घुसले. त्यामुळे शेती वाहून गेली आणि शेकडो एकर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
मिरजेसह जत तालुक्याला पाण्याची टंचाई जाणवत असल्याने म्हैसाळ योजना ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आली. एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. येथील टप्पा क्रमांक 4 ओव्हरफ्लो होण्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतीपिके धोक्यात आली आहेत.
कालव्यामधील ओव्हरफ्लो झालेले पाणी आरग येथील मुख्य पाझर तलावात सोडण्यात येते. ओव्हरफ्लो सिस्टीम कायमची बंद करून शेतीचे होणारे नुकसान टाळण्याची मागणी स्थानिक शेतकऱयांनी केली आहे. त्यातच ओव्हरफ्लोचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. म्हैसाळ योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे येथील पंप हाऊसपासून ते पाझर तलावापर्यंतची शेती उद्ध्वस्त झाली आहे.ओव्हरफ्लो सिस्टीम बंद दुसरा पर्ययाने पाणी पाझर तलावात सोडण्याची मागणी आहे. या पाण्यामुळे येथील रस्ता कातरून गेला आहे. माती वाहून गेली आणि पिकांचे नुकसान झाले आहे.

























































