दूषित पाण्याने परभणीला वेढले, २१३ नमुने आढळले दूषित

46
जगात अशुद्ध पाण्यामुळे दर तासाला 200 मुलांचा मृत्यू होतो

सामना प्रतिनिधी। परभणी

दूषित पाण्याने परभणीला वेढले असून येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत जिल्ह्यातील १०३० पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील २१३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक १७ नमुने दूषित आढळले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गाव स्तरावरील पाणी स्त्रोतांचे नमुने घेऊन जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, लघु प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी देण्यात आले होते. जून महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पाणी स्त्रोतांचे नमुने मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण १०३० नमुने प्रयोगशाळेकडे प्राप्त झाले होते. या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील तब्बल २१३ नमुने दूषित आढळले आहेत.

परभणी तालुक्यातील दैठणा, जांब, पेडगाव, पिंगळी, झरी या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१५ पाणीस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले होते. यातील ४६ नमुने दूषित आढळले आहेत. परभणी तालुक्यातील पेडगाव व झरी या दोन आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येकी ११ नमुने दूषित आढळले आहेत. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, कंठेश्वर, कावलगाव, ताडकळस या आरोग्य केंद्रांतर्गत पाणीस्त्रोतांच्या १५१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ११ नमुने दूषित आढळले. गंगाखेड तालुक्यातील धारासूर, कोद्री, महातपुरी, पिंपळदरी, राणीसावरगाव आरोग्य केंद्रांतर्गत ११४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ४० नमुने दूषित आढळले. सोनपेठ तालुक्यातील ५६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ७ नमुने दूषित आढळले आहेत.

पालम तालुक्यातील चाटोरी व रावराजूर या दोन आरोग्य केंद्रांतर्गत ७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील १३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सेलू तालुक्यातील देऊळगाव गात व वालूर आरोग्य केंद्रांतर्गत ७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील २६ नमुने दूषित आढळले आहेत. मानवत तालुक्यातील कोल्हा व रामपुरी आरोग्य केंद्रांतर्गत ९३ नमुन्यांपैकी १७ नमुने दूषित आढळले आहेत. जिंतूर तालुक्यातील आसेगाव, आडगाव, चारठाणा, कौसडी, वझर, येलदरी अंतर्गत १८५ नमुन्यांपैकी ३६ नमुने दूषित आढळले तर पाथरी तालुक्यातील बाभुळगाव, हादगाव, पाथरगव्हाण, वाघाळा आरोग्य केंद्रांतर्र्गत ६४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील १७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील १८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही पाणी नमुना दूषित आढळला नाही. तर सेलू तालुक्यातील वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४९ पाणी नमुन्याची तपासणी करण्यात आली. यातील १७ नमुने दूषित आढळले आहेत.दरम्यान, नागरिकांनी दूषित पाणी वापरु नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या