मेट्रोचा त्रास संपता संपेना, दादरमध्ये पुन्हा जलवाहिनी फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दादर पश्चिमेकडील शिवसेना भवनजवळ आज पुन्हा एकदा मेट्रो प्राधिकरणाने पालिकेची जलवाहिनी फोडली. मेट्रोच्या चुकांमुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. मेट्रोच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे संध्याकाळी पाणीपुरवठय़ाच्या वेळीच १८ इंचाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. मात्र काही तासांतच पालिकेच्या कर्मचाऱयांनी गळती थांबवून पाणी पुरवठा पूर्ववत केला.

दादर पश्चिम येथील शिवसेना भवनजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेकदा या ठिकाणी जलवाहिनी फोडण्याचे प्रकार घडले. त्यानंतर पालिका प्रशासनाने मेट्रो प्राधिकरणाला समजही दिली. मात्र तरीही आज सायंकाळी पाचच्या सुमारास तेथे काम सुरू असतानाच या भागाला पाणीपुरवठा करणारी १८ इंचाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून गेले. यामुळे सायंकाळी ४ ते ७  या वेळात जी-साऊथ वॉर्डमधील एन.एम.जोशी मार्ग, भवानी शंकर रोड तसेच जी/ नॉर्थ वॉर्डमधील एस. के. बोले रोड,सेनाभवन या भागातील पाणीपुरवठय़ावर त्याचा विपरीत परिणाम झाला. ऐन पावसातच पाणीपुरवठा खंडित झाल्याने तेथील लोकांचे प्रचंड हाल झाले. आधीच मेट्रोने रस्ता अडवलेला असताना पाण्याचा पूर आल्यामुळे तेथील लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

कोट्यवधींचा दंड
मेट्रोच्या कामामुळे एमएमआरसीएलने सर्वत्र रस्त्यांची चाळण केलेली असताना पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे यापुढे खोदकाम करताना आधी जलवाहिन्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करा, अशी समजच पालिका प्रशासनाने मेट्रोच्या अधिकाऱयांना दिली होती. तरीही कोणताही फरक पडलेला नाही. या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी येणारा खर्च आणि जलवाहिनी फुटल्यामुळे वाया गेलेले पाणी यांचे मूल्यमापन करून तो खर्च मेट्रो प्राधिकरणाकडून वसूल केला जातो. जलवाहिनीचा आकार, पाण्याचा दाब आणि किती वेळ पाणी वाहून गेले यानुसार वाया गेलेल्या पाण्याचे पैसेही म्हणून आतापर्यंत मेट्रोला कोटय़वधीचा दंड करण्यात आलेला आहे.

मेट्रोच्या चुका पालिका निस्तरते
दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली असून त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर ताबडतोब पालिकेच्या जलअभियंता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. १५ कर्मचाऱयांनी परिश्रम करून ही गळती काही तासांतच थांबवली व पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला.

– डिसेंबरपर्यंत तब्बल १३ ठिकाणी जलवाहिन्या फोडल्यामुळे पालिकेला भुर्दंड आणि मुंबईकरांना त्रास, दूषित पाणी पुरवठा सहन करावा लागला आहे.