
सामना प्रतिनिधी, परभणी
दिवसेंदिवस उष्णतेत प्रचंड वाढ होत असून पाण्याची पातळी खोल खोली गेली आहे. तसेच आहे त्या साठ्यातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याची प्रमाण वाढले आहे. त्यातच महानगरपालिकेच्या नळांना 15 ते 16 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने परभणीकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. सध्या खाजगी टँकरचालकांची चांदी होत असून 1000 लिटर पाण्यासाठी 250 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच भुर्दंड सोसावा लागत आहेत. मनपाचे टँकर झोपडपट्टी परिसरात सुरू असले तरी त्याचा लाभ तहानलेल्या कर भरणाऱ्या कॉलनीवासीयांना मिळत नाही.
परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील काकडेनगरात मनपाच्या पाण्याच्या टाकीवर खाजगी टँकरचा अधिक वावर असून आव्वाच्या सव्वा दराने हे टँकरचालक कॉलनीतील नागरिकांना पाणी विकतात. 1 हजार लिटरचे टँकर 300 रुपयांपर्यंत विक्री केल्या जाते. टँकरच्या आकाराप्रमाणे व त्यातील पाण्याच्या उपलब्धतेनूसार पाण्याची विक्री कमी जास्त होते. मनपाच्या नळाला मात्र 15 ते 16 दिवसानंतरच पाणी येथे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मनपाने नागरिकांना किमान आठ दिवसाआड पाणी देणे अपेक्षीत होते. मनपाची निवडणूक लढविताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना 4 दिवासाआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन हवेत विरले. आता परभणीकर जनतेला मात्र पश्चाताप होत आहे.
परभणीचा पारा बुधवार, 29 मे रोजी कमाल 44.6 आणि किमान 25.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवार, 28 मे रोजी परभणीचा पारा 46.1 अंशांची नोंद हवामान विभागात करण्यात आली होती. जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परभणीचा पारा 44 अंशांवर राहत असल्यामुळे नागरिक उन्हामुळे चांगलेच हैराण झाले आहेत. सकाळी 8 वाजेपासून उन्हाचे चटके बसू लागले असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऊन लागत असल्यामुळे शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाचा फटका, बाजारपेठेतील उलाढालीवरही होत आहे. व्यापाऱ्यांना दुपारच्या वेळी ग्राहकांची वाट पहावी लागत आहे.
याचवेळी परभणी जिल्ह्यात पून्हा एकदा उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज परभणीच्या वनामकृवि हवामान खात्याच्या विभागाने व्यक्त केला आहे. प्रचंड उन्हामुळे त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरल्याची प्रचिती आली आहे. परभणीत सध्या विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. रस्ते यामुळे दुपारच्यावेळी निर्मनुष्य होत आहेत. रस्त्यावरील दुचाकी वाहनधारकांची संख्या प्रचंड रोडावली असून वाहनधारकांच्या पायाची व हाताची लाहीलाही होत आहे. भाजल्याप्रमाणे हात व पायांची अवस्था दुचाकी वाहनधारकांच्या होत आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट आल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. तापमान वाढीमुळे नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. अनेक जण ऊन लागल्यामुळे तापीसारख्या आजाराने आजारी पडत आहेत. वयोवृद्धांचे मृत्यूचे प्रमाणही या पंधरवाड्यात वाढले आहे. शहर व जिल्ह्यात मिळून एकूण 100 च्या जवळपास वयोवृद्धांचे मृत्यू या पंधरवाड्यात झाले आहेत. वृद्धांना दमा, फुफ्फुसाचे आजार, उच्च रक्तदाब, ह्दयविकार असे विविध आजार होत आहेत. बालकांना ‘उन्हाळी’ हा आजार जास्त प्रमाणात होताना दिसत आहे.

























































