
सामना प्रतिनिधी । राहुरी
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कोतुळकडून राहुरीच्या मुळा धरणात ५ हजार ६३८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू राहिल्याने धरणाचा सायंकाळी सहाचा पाणीसाठा ५ हजार ७१० दशलक्ष घनफुट झाला. गेल्या ३० तासात राहुरीच्या मुळा धरणातील पाणीसाठ्यात तब्बल १ हजार दशलक्ष घनफुटाने वाढ झाली आहे.
हरिश्चंद्र गडाच्या पाणलोट क्षेत्रात वरूणराजाची कृपा झाल्याने कोतुळकडून प्रवास सुरू झालेले पाणी रविवार राञी १२ वाजता मुळा धरणात दाखल झाले होते. आज मंगळवारी सकाळी ६ वाजता मंगळवारी सकाळी ६ वाजता कोतुळकडून मुळा धरणात ४ हजार २२७ क्युसेकने, १२ वाजता ६ हजार क्युसेकने तर सायंकाळी ६ वाजता ५ हजार ६३८ क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती.हरिश्चंद्र गडाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू असल्याने कोतुळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक टिकुन आहे.पाण्याची आवक टिकुन राहिल्यास बुधवारी सकाळपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा ६ हजार दशलक्ष घनफुटाच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.
मुळा धरणात आवक सुरू होण्यापूर्वी मुळा धरणाचा पाणीसाठा ४ हजार ७०५ दशलक्ष घनफुट तर पाण्याची पातळी १७५२.९५ होती. मंगळवारी सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ७१० दशलक्ष घनफुट तर पाण्याची पातळी १७५८.१५ झाल्याने पाण्याचा साठा १ हजार दशलक्ष घनफुट तर पाण्याची पातळी सव्वा पाच फुटाने वाढली आहे.

























































