मागाठाणेच्या डोंगराळ भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली पूर्वेच्या मागाठाणे येथील देवीपाडा, काजूपाडा आणि केतकीपाडा या डोंगराळ भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लवकरच दूर होणार आहे. त्यासाठी तत्काळ उपाययोजना करून अहवाल पंधरा दिवसांत सादर करावा असे निर्देश मंत्री शंभुराज देसाई यांनी आज मुंबई महानगरपालिकेला दिले.

शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी या समस्येवर विधान परिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला होता. पाणीटंचाईबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना झाली नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकेने शोषण टाकी व उदंचन केंद्र कार्यान्वित करूनदेखील पम्पिंग स्टेशनची क्षमता कमी असल्याने पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे, असे त्यांनी सभागृहाला सांगितले. सदर परिसरात पाणीपुरवठा करणाऱया जलकुंभातील पाण्याची पातळी जोपर्यंत 3.2 मीटर राखली जात नाही तोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, असे पोतनीस यांनी निदर्शनास आणून दिले.

त्याला उत्तर देताना शंभुराज देसाई यांनी या तीनही विभागात ज्या उपाययोजना हव्यात त्या महापालिकेने केल्या असून पाणीपुरवठा सुरळीत होत आहे असा दावा केला. देसाई यांच्या त्या दाव्यावर शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते आमदार ऍड. अनिल परब यांनी आक्षेप घेतला. पाणीपुरवठय़ात कट आहे का, असा सवाल त्यांनी केला. ज्या अधिकाऱयांनी मंत्र्यांना ही माहिती दिली त्या अधिकाऱयांना पाण्याची पातळी किती आहे? मुंबईत पाणी मुबलक असताना काही भागांमध्ये कमी का येते? उपनगरात पाणीकपातीचे कारण काय? याबद्दल शासनाने विचारणा करावी, असे आमदार परब म्हणाले.