
जिह्यात पावसाने दडी मारल्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रशासनाला टँकरद्वारे नागरिकांच्या घशाची कोरड भागवावी लागत आहे. जिह्यात गेल्या सात दिवसांत पाण्याच्या टँकरची संख्या दहाने वाढत टँकरची संख्या 70 वर पोहचली आहे. या टँकरद्वारे 1 लाख 44 हजार जनतेला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दरम्यान, ऑक्टोबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीतील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनार्थ तयार करण्यात येत असलेल्या कृती आराखडय़ावर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे काम सुरू आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीतजास्त ‘जलजीवन योजने’तील पाणी योजना कार्यान्वित करण्यावर भर असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. जिह्यात गेल्या दोन महिन्यांत अवघ्या 194.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसाअभावी 73 गावे आणि 433 वाडय़ा-वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवडय़ात पाण्याच्या टँकरची संख्याही 60 होती. त्यात आता दहाने वाढ होऊन सोमवारपासून जिह्यात 70 पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिह्यात आतापर्यंत झालेल्या भिज पावसावर 100 टक्के खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र, पावसाने गुंगारा दिल्याने खरीप हंगाम वाया जाण्यासोबत रब्बी हंगामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास निम्मा पावसाळा संपत आला असून, परतीचा पाऊस लांबल्यास जिह्यावर दुष्काळाचे सावट आहे. जिह्यात चार वर्षांपासून पाऊस समाधानकारक होत असल्याने पिकांसोबत धरणसाठय़ाची स्थिती समाधानकारक होती. सलग चार वर्षे जिल्हाभरातील प्रमुख धरणांसोबत दक्षिणेतील मध्यम प्रकल्पांत चांगला पाणीसाठा होता. यासह दमदार पावसामुळे भूजलपातळीत वाढ झाली होती. यामुळे खरीप आणि रब्बी हंगामांतील पिकांची स्थिती उत्तम होती. यासह उन्हाळी हंगामात शेतकऱयांचा पाणीप्रश्न मिटलेला होता. यामुळे जून महिन्यात प्रशासनाला पहिल्यांदा पाण्याचा टँकर सुरू करावा लागला होता.
यंदा पाऊस उशिरा होणार असल्याचा अंदाज असल्याने शेतकऱयांसह प्रशासन सुस्त होते. मात्र, जूनपाठोपाठ जुलै महिना कोरडा गेला. आता सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा संपण्याची वेळ आली आहे. अपवाद वगळता जिह्यात दमदार पाऊस नाही. अनेक ठिकाणी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने अंशतः शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे जिह्यात मोठय़ा प्रमाणात पशुधन असून, त्यांच्यासाठी हिरव्या चाऱयाचा गंभीर प्रश्न आहे. चाराटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात नगरमधून दुसऱया जिह्यात चारा वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिसरात सुरू असलेले टँकर
संगमनेर 11, नगर 12, पारनेर 27, पाथर्डी 18 आणि जामखेड 2 असे 70 टँकर जिह्यात सुरू असून, या टँकरद्वारे 1 लाख 44 हजार जनतेची तहान भागवण्यात येत आहे.