वेब न्यूज – क्रिप्टोकरन्सी पुन्हा चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

जगप्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी सध्या पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आलेली आहे. तिच्या घसरत्या भावामुळे ती आधीही चर्चेत होतीच, पण आता काही खास वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. यातले पहिले कारण आहे ‘अल सल्वाडोर’ हा देश. दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ‘अल सल्वाडोर’ने क्रिप्टोकरन्सीच्या वापरावरती आता कायदेशीर मोहोर उमटवली आहे. मात्र त्याच्या या निर्णयाला ‘वर्ल्ड बँके’ने ‘नकारघंटा’ वाजवली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या अधिकृत वापरासाठी ‘अल सल्वाडोर’ देशाने ‘वर्ल्ड बँक’कडे तांत्रिक मदत मागितली होती. मात्र क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात नसलेली पारदर्शकता आणि पर्यावरणाची हानी यांचा दाखला देत ही मागणी नाकारण्यात आली. जगभरातील चलन हे त्या त्या देशाच्या केंद्रीय बँकेच्या नियंत्रणाखाली असते. मात्र क्रिप्टोकरन्सीसारख्या ‘इक्रिप्टेड’ डिजिटल करन्सीचे नियंत्रण, ही करन्सी ‘खरेदी-विक्री’ करणाऱयांच्या सामूहिक हातात असते. त्यामुळेच जगातील अनेक प्रमुख देशांनी आजही या करन्सीला अधिकृत मान्यता दिलेली नाही. ही करन्सी चर्चेत यायचे दुसरे कारण म्हणजे हिंदुस्थान होय. हिंदुस्थानात आजही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना कायदेशीर दर्जा प्राप्त झालेला नाही. मात्र क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठय़ा प्रमाणावरती हिंदुस्थानात गुंतवणूक होते आहे हेदेखील सत्य आहे. सध्या हिंदुस्थानात 19 ‘क्रिप्टोएक्सचेंज मार्केट’ आहेत. त्यातील ‘वझीरएक्स’ हे मार्केट सध्या चांगलेच चर्चेत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी)’ ने ‘वझीरएक्स’च्या संस्थापकांना विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम (फेमा) 1999च्या कायद्याखाली 1971 कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी व्यवहारांचा हिशेब देण्यास सांगितले आहे. हे व्यवहार करताना ‘केवायसी’ अर्थात ग्राहकांची ओळख पटवणाऱया कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता ‘वझीरएक्स’ने केलेली नाही, असा ठपका ठेवण्यात आलेला आहे. यात काही चिनी नागरिकांचा सहभाग असल्याचादेखील आरोप आहे. तिकडे खुद्द चायनाने ‘मनी लॉण्डरिंग’च्या आरोपाखाली तब्बल 1100 लोकांना अटक केली आहे. चायनाने गेल्याच वर्षी ‘डिजिटल करन्सी’च्या क्षेत्रात पाऊल ठेवत काही शहरांमध्ये ‘डिजिटल युआन’ ही करन्सी चालू करण्याचा प्रयोग केला आहे.