
काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानचे एक सुपर सॉनिक मिसाईल चुकीने पाकिस्तानात जाऊन पडले. पाकिस्तानच्या चन्नू मिंया शहराजवळ पडलेले हे मिसाईल ‘ब्रह्मोस’ असल्याचा अनेकांनी दावा केला आहे. आता या मिसाईलबद्दलचा हा दावा जर खरा असेल तर ती हिंदुस्थानसाठी अत्यंत चिंतेची आणि धोक्याची गोष्ट आहे, असे मत संरक्षण क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्त करत आहेत. या तज्ञांनी ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’च्या मदतीने पाकिस्तान या क्षेपणास्त्र्ााची हुबेहूब नक्कल तयार करेल अशी चिंता सतावत आहे. ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’मध्ये एखाद्या गोष्टीला कसे बनवण्यात आले आहे त्याची पूर्ण उत्पादन पद्धती अभ्यासाद्वारे शिकली जाते. पाकिस्तानने यापूर्वीदेखील ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’च्या मदतीने एक मिसाईल तयार करण्यात यश मिळवले आहे. पाकिस्तानने ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’च्या मदतीने अमेरिकेच्या ‘टॉम हॉक क्रूझ’ मिसाईलचे डुप्लिकेट व्हर्जन बनवण्यात यश मिळवले आहे. या मिसाईलचे नाव ‘बाबर’ ठेवण्यात आले आहे. याबद्दल पाकिस्तानचे भूतपूर्व प्रधानमंत्री नवाज शरीफ यांनी माहिती दिली होती. 1998 साली केनिया आणि टंझानिया इथल्या अमेरिकन दूतावासावरती ‘अल कायदा’ने हल्ले चढवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानातील या संघटनेच्या अड्डय़ांवर ‘टॉम हॉक क्रूझ’ने हल्ला चढवला होता. यातले एक मिसाईल चुकून पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जाऊन कोसळले. या मिसाईलचे अवशेष गोळा करून ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’च्या मदतीने पाकिस्तानने ‘बाबर’ तयार केले. पाकिस्तानच्या जोडीने चीन आणि रशियादेखील ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’च्या क्षेत्रात मातब्बर आहेत. 1958 साली तैवानने अमेरिकन मिसाईल ‘साइड वाइंडर’ने चायनाच्या दिशेनं हल्ला केला होता, मात्र हे मिसाईल फुटलेच नाही. चायनाने हे मिसाईल ताब्यात घेतले आणि सोव्हिएत संघाच्या ताब्यात दिले. या मिसाईलपासून मग त्यांनी ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’च्या मदतीने ‘के-13’ हे मिसाईल बनवण्यात यश मिळवले. पाकिस्तान आता चायनाच्या मदतीने असाच काही उपद्व्याप तर करणार नाही ना, ही चिंता सध्या सगळ्यांना पडली आहे.





























































