वेब न्यूज – ट्विटरचा अनोखा सर्व्हे

>> स्पायडरमॅन

आधी ऑर्कुट, मग फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा पर्याय मिळाला अन् जगभरातील लोकांना व्यक्त होण्यासाठी सहजसोपा पर्यायच सापडला. कौटुंबिक असो, सामाजिक असो वा राजकीय, करमणूक असा कोणताही विषय असो, लोक प्रत्येक विषयावरती हिरीरीने मत मांडू लागले, चर्चा घडू लागल्या आणि खऱया अर्थाने जग एकमेकांच्या जवळ आले. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तर सोशल मीडिया हाच अनेकांच्या आयुष्याचा आधार बनून गेला आहे. एकांतवासाची शिक्षाच जणू या सोशल मीडियाने आनंदात बदलून टाकली आहे. घरातल्या कौटुंबिक सोहळ्यापासून ते चांद्रयानापर्यंतच्या घडामोडी लोक आप्तस्वकियांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. या सगळ्याची दखल घेत सोशल मीडियावरील एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरने नुकताच 22 शहरांतून करण्यात आलेल्या साडेआठ लाख ट्विटस्चे विश्लेषण करून काही मनोरंजक तथ्यं समोर आणली आहेत. या विश्लेषणानुसार पशू, उत्सव, सेलिब्रिटीज सोबत जोडले गेलेले वेगवेगळे  परिवार, भोजन, आजूबाजूला घडणारी सकारात्मक कार्ये, विनोद, प्रेम, खेळ आणि जुन्या आठवणी हे विषय सर्वात जास्त चर्चेत राहिले. प्रेम, त्या विषयावरील संवाद यात लुधियाना अव्वल स्थानी राहिले, तर हैदराबाद, चेन्नई, एर्नाकुलमसारख्या दक्षिणेकडील शहरांमध्ये खेळ, सेलेब्रिटीजशी जोडले गेलेले विषय, उत्सव आणि खाद्यपदार्थांवरती सर्वात जास्त चर्चा झडल्या. भुवनेश्वरमध्ये सकारात्मक व चांगली कार्ये आणि कुटुंब ह्या विषयावरती चर्चा रंगल्या होत्या. मुंबईकरांनी जुन्या आठवणी जागवण्यात अव्वल क्रमांक मिळवला, तर रायपूरसारख्या शहराने जनावरे व त्यासंदर्भातील विषय चर्चण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. चेन्नइनंतर विशाखापट्टणम आणि कोईंबतूर यांनी सेलिब्रिटीजशी संबंधित विषयावरती सर्वात जास्त चर्चा केली आहे. या शहरातील चाहते ट्विटरसारख्या माध्यमातून आपल्या आवडत्या स्टार्सबरोबर थेट जोडले जाण्यास प्राधान्य देत असल्याचे देखील समोर आले आहे. तर सध्या हिंदुस्थानाचे फूड कॅपिटल म्हणून समोर येत असलेल्या एर्नाकुलमच्या मागोमाग बेंगलुरू आणि लुधियानाकडून फक्त विविध खाद्यपदार्थांवरतीच चर्चा करण्यात पुढाकार घेतलेला नाही, तर विविध पदार्थांचे सुंदर फोटोदेखील सर्वात जास्त शेअर करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या