
सामना प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू आणि गुजरात अशा पाच राज्यांमध्ये पसरलेल्या 1 लाख 60 हजार किलोमीटरच्या पश्चिम घाटात केवळ भुरळ घालणारा निसर्गच नाही तर ऊर्जेची नैसर्गिक स्रोतेही आहेत. पवई येथील आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी पश्चिम घाटात भूऔष्णिक ऊर्जेच्या (जिओथर्मल एनर्जी) स्रोतांचा शोध घेतला आहे. त्यांना पश्चिम घाटातील महाराष्ट्राच्या किनारपट्टीला 18 ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळले. या स्रोतांद्वारे स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेची निर्मिती केली जाऊ शकते.
आयआयटी मुंबईतील अर्थ सायन्स विभागातील प्राध्यापक तृप्ती चंद्रशेखर यांनी पश्चिम घाटाचा अभ्यास केला. त्यांच्यासह आयआयटी हैदराबाद, अमेठीतील राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी आणि इटलीतील फ्लोरेन्स विद्यापीठाचे शास्त्रज्ञही होते. या शास्त्रज्ञांच्या टीमने पश्चिम घाटाचा दौरा केला. त्यात महाराष्ट्राच्या हद्दीतील किनारपट्टीच्या 350 किलोमीटरच्या क्षेत्राचा समावेश होता. शास्त्रज्ञांच्या टीमने दौरा केलेल्या क्षेत्रात गरम पाण्याचे 60 नैसर्गिक झरे आढळले. त्या पाण्याचे तापमान 40 ते 72 डिग्री सेल्सिअसदरम्यान असते, अशी माहिती या शास्त्रज्ञांनी दिली.
गरम पाण्याच्या झऱ्यांचा असा होऊ शकेल वापर…
पश्चिम घाटातील भूऔष्णिक ऊर्जेचा वापर करून नैसर्गिक ग्रीनहाऊसेस बनवली जाऊ शकतात. तशी ग्रीनहाऊसेस तुर्की, रशिया, हंगेरी, चीन आणि इटली येथे आहेत.
नाशिवंत पदार्थांसाठी डिहायड्रेशन युनिटस् बनवली जाऊ शकतात. पश्चिम एशिया आणि शेनजेन प्रांतात तशी युनिटस् आहेत.
न्यूझीलंडमधील वायराकेई आणि आइसलॅण्डमधील ब्लू लगून भागात अशा गरम पाण्याच्या झऱ्यांचा वापर करून ऍक्वाकल्चर सेंटर्स आणि हेल्थ स्पा सुरू करण्यात आली आहेत. तशीच हिंदुस्थानातही सुरू करता येतील आणि त्यातून रोजगारनिर्मितीही होईल.
जियोथर्मल एनर्जी म्हणजे काय?
जियोथर्मल एनर्जी म्हणजे पृथीच्या तापमानामुळे भूगर्भातील पाण्याचे झरे गरम होतात. ही जियोथर्मल एनर्जी नैसर्गिक असल्याने ‘ग्रीन एनर्जी’ म्हणूनही ओळखली जाते. या गरम पाण्याचा साठा भूगर्भातील टाक्यांमध्ये केला जातो. महाराष्ट्रातील कोकणपट्टीत असे गरम पाण्याचे झरे अनेक ठिकाणी आढळतात. त्या पाण्यामध्ये औषधी गुणधर्मही असतात आणि त्याला धार्मिक महत्त्वही आहे.
summary- western ghat has hot water sources


























































