
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. 92 नगरपरिषदांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 22 जुलैपासून उमेदवारी अर्ज भरता येणार असून, 18 ऑगस्टला मतदान, तर 19 रोजी मतमोजणी होणार आहे. सोलापूर जिह्यातील 11 नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत, नगर जिह्यातील नऊ नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यातील प्रत्येकी पाच नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या क्षेत्रातील राज्यातील सर्वच निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या असून, त्या पुढील टप्प्यात होणार आहेत.
कोरोनाच्या महामारीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यातील जनतेचे निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती मागवल्या असताना शासनाने तो कार्यक्रम स्थगित केला होता. आता प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम स्थगित केलेल्या टप्प्यापासून राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा सुरू केल्या होत्या.
सांगली जिह्यातील पाच नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या प्रारूप रचनेवर 32 हरकती दाखल झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी चौधरी यांनी 23 मे रोजी सुनावणी घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी ईश्वरपूर आणि विटा या ‘ब’ वर्गात असणाऱया नगरपरिषदेच्या हरकतींवरील अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाकडे, तर आष्टा, पलूस, तासगाव या नगरपरिषदांचा आणि शिराळा नगरपंचायतीवर प्राप्त झालेल्या हरकतींवर अभिप्राय विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. 6 जून रोजी निवडणूक आयोग आणि विभागीय आयक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली होती. त्यानंतर 7 रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचनेची घोषणा करण्यात आली.
नगर जिह्यातील सहा नगरपालिकांचा यामध्ये समावेश असून, त्या त्या तालुक्यांमध्ये निवडणुकीची धामधूम दिसून येणार आहे. आज अधिकृत घोषणा झाल्याने सुस्तावलेल्या इच्छुकांच्याही जोरदार हालचाली सुरू होणार आहेत.
सातारा जिह्यातील अतिवृष्टीची चिंता नसलेल्या कराड, फलटण, वाई, रहिमतपूर तसेच म्हसवड या पाच नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल आज वाजला. त्यामुळे राजकीय आघाडीवर हालचालींना कमालीचा वेग आला आहे. अतिवृष्टीमुळे अडथळा येऊ शकतो अशा सातारा, महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिका तसेच मेढा नगरपंचायतीची निवडणूक मात्र पुढील टप्प्यात होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झालेल्या नगरपरिषदा/नगरपंचायती
सोलापूर – बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा,
नगर – कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, दे. प्रवरा, पाथर्डी, राहाता, राहुरी, नेवासा, सांगोला, अनगर
कोल्हापूर – जयसिंगपूर, गडहिंग्लज, कुरूंदवाड, मूरगुड, वडगाव
सांगली – ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, पलूस
सातारा – कराड, फलटण, रहिमतपूर, वाई, म्हसवड


























































