
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलच्या एसी प्रवाशांची संख्य झपाटय़ाने वाढत आहे. सध्या एसी लोकलच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या जवळपास एक लाखाच्या घरात आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेला आणखी एसी लोकल वाढवायच्या आहेत, पण नवीन गाडय़ाच उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे नवीन गाडय़ा येईपर्यंत आहे त्याच 7 गाडय़ांच्या माध्यमातून 79 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेकडून दररोज 1387 उपनगरीय लोकल फेऱ्या चालवल्या जातात. या गाडय़ांना मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांनी आरामयी प्रवास करता यावा म्हणून पश्चिम रेल्वेने 2017 मध्ये पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर टप्प्या टप्प्याने एसी लोकलच्या संख्येत वाढ केली असून सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर 7 गाडय़ा धावतात. दिवसभरात 79 फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून एसी लोकल वाढवण्याची प्रवाशांकडून मागणी होत आहे. प्रशासनालाही गाडय़ा वाढवायच्या आहेत. त्यानुसार आयसीएफ चेन्नई यांच्याकडे नवीन गाडय़ांची मागणीही केली आहे. त्यांच्याकडून गाडय़ा उपलब्ध झाल्यानंतरच फेऱ्या वाढवण्यात येतील अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या प्रवत्त्याने दिली.
वंदे भारतमुळे विलंब
पश्चिम रेल्वेने एसी लोकल गाडय़ा मिळाव्यात म्हणून आयसीएफकडे मागणी नोंदली आहे. मात्र सध्या अयसीएफमध्ये वंदे भारत ट्रेन बनवण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच एसी लोकल गाडय़ा उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


























































