दीपोत्सवाने उजळले व्हाइट हाऊस, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केला हिंदुस्थानी परंपरांचा गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महासत्ता अमेरिकेच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दिवाळी उत्सव यंदा आयोजित करण्यात आला. व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने दीपोत्सवाचा शुभारंभ झाला. ‘दिवाळी हा आता अमेरिकेच्या संस्कृतीचा भाग बनला आहे,’ असे उद्गार काढत यावेळी बायडेन यांनी हिंदुस्थानी परंपरांचा गौरव केला.

व्हाइट हाऊस यंदा दिवाळी उत्सवाने उजळून निघाले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या सोहळय़ाचे आयोजन केले होते. अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन आणि हिंदुस्थानी वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस सोहळय़ाला उपस्थित होत्या. बायडेन आणि कमला हॅरिस यांनी व्हाइट हाऊसमध्ये हिंदुस्थानींचे आदरातिथ्य केले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेत वास्तव्य असलेले दोनशेहून अधिक मान्यवर या सोहळय़ात सहभागी झाले होते.
दिवाळी अमेरिकेच्या संस्कृतीचा भाग

हिंदुस्थानवासीयांचे आदरातिथ्य करणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. दिवाळी हा आज अमेरिकेच्या संस्कृतीचा भाग बनला आहे, यासाठी मी अमेरिकेत योगदान देणाऱया हिदुस्थानवासीयांना धन्यवाद देईन, असे यावेळी जो बायडेन म्हणाले. कमला हॅरिस यांनी प्रकाशपर्वाचे महत्त्व अधोरेखित केले. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश हा सण आपल्याला देतो, असे नमूद करत जगात शांतता नांदू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली.