
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊस गोळीबाराने हादरले. व्हाईट हाऊसच्या चेकपोस्टवर एका हल्लेखोराने बेछूट गोळीबार केल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोराने 30 गोळ्या झाडल्या. घटना घडली त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच होते. महिनाभरात दुसऱ्यांदा ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, नासीर बेस्ट (21) असे हल्लेखोराचे नाव असून त्याने व्हाईट हाऊसजवळच्या चेकपोस्टवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या चेकपोस्टवर अमेरिकेच्या सिव्रेट सर्व्हिसचे अधिकारी तैनात होते. त्यांनी तत्काळ हल्लेखोराला हेरून प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात नासीर बेस्ट गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात मृत जाहीर करण्यात आले. नासीर बेस्ट याच्या गोळीबारात एक सर्वसामान्य नागरिक जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांनी सिव्रेट सर्व्हिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले आहे. या यंत्रणांनी अतिशय त्वरित आणि पद्धतशीरपणे कारवाई केली. त्यामुळे हल्लेखोराला लगेच रोखण्यात आले. भविष्यात राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी आणखी मजबूत यंत्रणेची गरज असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
यापूर्वीही हल्लेखोराने व्हाईट हाऊसमध्ये शिरण्याचा केला होता प्रयत्न
नासीर बेस्ट याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या चेकपोस्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. तो स्वतःला येशू ख्रिस्त म्हणायचा. मला अटक करा, असे त्यावेळी तो ओरडत होता. त्याची मानसिक अवस्था नीट नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
पाऊण तास लॉकडाऊनची स्थिती
गोळीबार झाला ते ठिकाण व्हाईट हाऊसपासून एक ब्लॉक अंतरावर आहे. अचानक गोळीबार सुरू होताच परिसरात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी जवळच असलेले पत्रकार व इतर कर्मचाऱयांना सुरक्षित ठिकाणी नेले. काही क्षणात हल्लेखोराला प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच चेकपोस्टच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला. संपूर्ण परिसराला एफबीआय तसेच सिव्रेट सर्व्हिस एजंटसह सुरक्षा दलांनी वेढा घातला. जवळपासचे सर्व रस्ते रिकामे करण्यात आले. कोणालाही या भागात प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर या परिसरात सुमारे पाऊण तास लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली होती.
गेल्याच महिन्यात ट्रम्प यांच्या कार्यक्रमस्थळी झाला होता गोळीबार
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 26 एप्रिल रोजी वॉशिंग्टन डीसीमध्येच व्हाईट हाऊस प्रतिनिधींच्या डिनरच्या वेळी गोळीबार झाला होता. हल्लेखोराने समारंभ असलेल्या हॉटेलच्या बॉलरूमबाहेर गोळीबार केला होता. ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलेनिया, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्यासह अनेक उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांची कन्या इवांका यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी इराणच्या सैन्याशी संबंधित एका तरुणाला अटक करण्यात आली. आता व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे.
महिला पत्रकाराने वाचवला स्वतःचा जीव
हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार सुरू केला त्यावेळी जवळच एबीसी न्यूजच्या पत्रकार सेलिना वांग या सोशल मीडिया व्हिडीओ शूट करत होत्या. अचानक त्यांच्या पाठीमागून गोळीबार सुरू झाला. त्यांनी प्रसंगावधान राखत खाली झोपून स्वतःचा बचाव केला. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
























































