
सामना ऑनलाईन । कोलकाता
पश्चिम बंगालच्या कोलकातमध्ये गेल्या आठवड्यात पत्नीनेच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पतीच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून त्या महिलेने पतीची हत्या केल्याचे तिच्या चौकशीत उघड झाले आहे. अनिंदिता पॉल डे यांनी गेल्या आठवड्यात पती रजत डे यांची हत्या केली होती. रजत दररोज लैंगिक शोषण करत असल्याने रागाच्या भरात आपण त्याची हत्या केल्याचे अनिंदिता यांनी चौकशीत सांगितले आहे. हे दांपत्य न्यू टाऊन येथे राहत होते. ते दोघेही पेशाने वकील होते. वैद्यकीय सल्ला झुगारून रजतने संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. त्याला आपण विरोध केल्यावर त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रागाच्या भरात रजतची हत्या केल्याचे तिने सांगितले.
रजत नेहमी मानसीक आणि शारीरिक शोषण करत होता. तसेच संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे अनिंदिता यांनी चौकशीत सांगितल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. तसेच संबंधात तणावही निर्माण झाला होता. गेल्या रविवारीही त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अनिंदिता यांनी दिलेल्या जबानीची सतत्या पडताळून पाहण्याचे काम सुरू आहे. तिने आतापर्यंत जबानीत बदल केल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. अनिंदिता यांची दोन महिन्यापूर्वी फेलोपियन ट्यूबची शस्त्रेक्रिया झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना संबंध ठेवण्यास मनाई केली होती. तरीही रजत संबंध ठेवण्यासाठी अनिंदितावर दबाव टाकत होता असे अनिंदिताचे वकील चंद्रशेखर बाग यांनी सांगितले. या प्रकरणत अनिंदिता यांना कोणी मदत केली होती किंवा त्यांनीच ही हत्या केली याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.


























































