
सामान ऑनलाईन । औंढा नागनाथ
औंढा नागनाथ तालुक्यातील दुरचुना शिवारात रानडुकराची शिकार करणे सहा जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. वन विभागाने या सहा जणांना ताब्यात घेतले असून शिकार केलेल्या रानडुक्कराचे अवशेषही जप्त केले आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असुन दुरचुना शिवारामध्ये दिनकर केशव चव्हाण या शेतकऱ्याच्या मालकीच्या गट क्रमांक 20 मध्ये वन्यप्राणी रानडुकराची शिकार करण्यात आली. विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र कार्यालय औंढा नागनाथ यांच्या पथकाने रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले आहे. आरोपींमध्ये दुरचुना येथील राजाराम गायकवाड, सुनील धनवे, विठ्ठल आडे, उत्तम चव्हाण, परमेश्वर चव्हाण, राहुल आडे या सहा जणांचा समावेश असुन यांनी रानडुक्कराची शिकार करुन त्याचे अवशेष पिशवीमध्ये भरुन घेऊन जात होते. मात्र, वन विभागाच्या पथकाने या सहा जणांना रानडुकराच्या अवशेषासह रंगेहात पकडुन औंढा नागनाथ येथील परिक्षेत्र कार्यालयात आणले. या सहा जणांविरुध्द भारतीय वन्यप्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.






























































