कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा एकत्रितपणे सामना करणार- हसन मुश्रीफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. दुसऱया लाटेने आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडले. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱया लाटेचा एकत्रित सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. त्यादृष्टीनेच अधिकच्या आरोग्य सुविधा निर्माण करून प्रतिबंध करण्यासाठी सज्ज होत आहोत, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या 1100 बेड्सच्या कोविड सेंटरला अर्थात खासदार शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. भाळवणी येथील कार्यक्रमास आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, किशोर माने, डॉ. प्रकाश लाळगे यांच्यासह सरपंच राहुल झावरे, बाबाजी तरटे उपस्थित होते. श्रीगोंदा येथे आमदार बबनराव पाचपुते, राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसऱया लाटेची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. आपल्याला यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर आपण काहीसे निर्धास्त झालो. ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसऱया लाटेत गंभीर फटका बसला. ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, औषध उपलब्धता आदींबाबत नव्याने नियोजन करण्यास या लाटेने भाग पाडल्याचे ते म्हणाले.

संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन आता प्रशासन, नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे तयार राहिले पाहिजे. अत्यावश्यक काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्यात त्यादृष्टीने ऑक्सिजन उपलब्धता, ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था, औषधसाठा उपलब्धता याचे नियोजन आणि तयारी आतापासूनच केली जात आहे. आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. जिल्ह्यात 14 ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पारनेर आणि श्रीगोंदा तालुका आढावा बैठकीत त्यांनी दोन्ही तालुक्यांतील विविध अडचणी समजावून घेतल्या. जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांमार्फत होणारा संसर्ग थांबेल आणि ही साखळी तोडण्यास मदत होईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

आमदार लंके यांचे काम आदर्शवत

आमदार नीलेश लंके यांनी कोरोनाकाळात सर्वसामान्यांसाठी केलेले काम अभिमानास्पद असल्याचे सांगत देश आणि राज्यासाठी हे काम आदर्शवत असल्याचे कौतुकोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. यावेळी आरोग्य मंदिरासाठी दोन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.