
पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नी आणि मुलाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. शकिला अहमद खान आणि रशीद अहमद खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
तक्रारदार या जोगेश्वरी येथे राहतात. हमीद खान हे पत्नी, नातू आणि त्याच्या दोन मुलांसोबत राहत होते. हमीद हे पूर्वी रिक्षा चालवायचे. 2010 मध्ये हमीदवर बायपास सर्जरी झाली होती. तसेच त्यांना दोन वेळेस हृदयविकाराचा झटका आला होता. 2018 मध्ये त्यांच्या मणक्याचे ऑपरेशन झाले होते. त्यांना काहीही त्रास झाला असता तर तो त्यांच्या जिवावर बेतला असता. 2017 साली हमीद याने त्याचे दुकान पत्नीच्या नावावर केले होते. शकिलाने ते दुकान मुलाला अंधारात ठेवून नातवाला विकले होते. याची माहिती हमीदला मिळाली. त्यावरून हमीदचा सोहेलचा वाद झाला होता.
अंधेरी येथे एक सदनिका हमीदच्या नावावर होती. हमीद ती सदनिका विकून त्याचा हिस्सा देणार होता. त्या फ्लॅट विक्रीवरून त्यांच्यात भांडणे सुरू होती. गेल्या आठवडय़ात हमीदने बाहेरून नास्ता आणला होता. तसेच रात्रीचे जेवणदेखील त्याने बाहेर केले होते. नुकतेच तक्रारदार यांच्या नातीच्या पतीचा हमीदला फोन आला. त्यानंतर हमीदने शकिलाला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर रशीद हा हमीदशी भांडू लागला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने हमीदला मारहाण केली. तसेच हमीदला बेडवरून खाली ढकलून दिले. हमीद हे आपणास मारहाण करू नका, आपली बायपास सर्जरी झाली आहे असे त्यांना सांगत होते. मात्र ते दोघे ऐकाच्या मनःस्थितीत नव्हते. एकाने हमीदला ढकलले. भिंतीवर डोके आपटल्याने हमीदला दम लागला. त्यांना उचलून बेडवर ठेवले. हमीद हे हालचाल करत नसल्याने याची माहिती पोलिसांना दिली. काहीच वेळात ओशिवरा पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी हमीदला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हमीदच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच शकिला आणि रशीदला अटक केली.
























































