
हरयाणात एका पोलीस अधिकाऱ्याला ट्रकने चिरडून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच झारखंडमधील रांची शहरात देखील असाच प्रकार समोर आला आहे. रांची शहरातील चेकपोस्टवरून पळून जात असलेल्या एका ट्रकने महिला पोलीस अधिकारीला चिरडले. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. संध्या टोपनो असे त्या महिला पोलिसाचे नाव आहे.
रांचीच्या तुपुदाना भागात बुधवारी रात्री चेकपोस्टवर वाहनांची तपासणी केली जात होती. पोलिसांना प्राण्यांच्या तस्करीची माहिती मिळाली होती. त्यामुळे तुपुदाना येथे चेकपोस्टवर सर्व वाहनाची तपासणी होत होती. त्यावेळी पोलीस अधिकारी संध्या टोपनो यांनी एका पिकअप व्हॅनला थांबण्याचा इशारा केला. मात्र त्या व्हॅनच्या ड्रायव्हरने गाडी न थांबवता पळुन जायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने गाडीने संध्या यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो पिकअप व्हॅनवाला गाडीसह पळून गेला.
घटनास्थळावरील पोलिसांनी तत्काळ त्या पिकअप व्हॅनचा पाठलाग केला व त्या ड्रायव्हरला अटक केली. पोलिसांनी व्हॅन देखील जप्त केली आहे.


























































