
एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान ही घटना घडली होती. शनिवारी एअर इंडियाने या संदर्भात एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी म्हटले की, ‘आमच्या फ्लाइट क्रमांक AI-630 मध्ये 23 एप्रिल 2023 रोजी एका प्रवाशाला विंचू चावल्याची दुर्दैवी घटना घडली. फ्लाईट विमानतळावर उतरल्यानंतर सदर प्रवाशाला डॉक्टरांनी तपासले आणि नंतर रुग्णालयात उपचारा दिल्यानंतर सोडण्यात आले.’
एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर विंचू सापडला. यानंतर या विमानात पेस्ट कंट्रोलची प्रक्रिया करण्यात आली. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर एअर इंडियाने कॅटरिंग विभागाकडून लॉन्ड्री सेवा पुरवणाऱ्यांना सल्लागार जारी केला आहे. विमानात कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे का? आणि गरज भासल्यास विमानात पेस्ट कंट्रोल करावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
याआधीही विमानात साप सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात दुबई विमानतळावर उतरल्यानंतर एक साप आढळला होता. गेल्यावर्षी एप्रिलमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. यावेळी एअर इंडियाच्या विमानात उंदीर आढळून आला होता. उंदराचा आवाज येताच विमानाची तपासणी करण्यात आली. त्यामुळे श्रीनगरहून जम्मूला जाणाऱ्या विमानाला सुमारे दोन तास उशीर झाला होता.
जानेवारी 2020 मध्येही विमानात उंदीर आढळल्याने खळबळ उडाली होती. वाराणसी विमानतळावर ही घटना घडली होती. एअर इंडियाचे विमान वाराणसीहून डेहराडूनला जाणार होते. विमानात उंदीर असल्याची तक्रार आल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले आणि त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. यावेळी विमानाची बराच वेळ तपासणी करण्यात आली मात्र उंदीर सापडला नाही. यानंतर प्रवाशांना 24 तासांसाठी हॉटेलमध्ये हलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी एअर इंडियाचे एअरबस 319 हे विमान प्रवाशांना घेऊन डेहराडूनला रवाना झाले.


























































