महिलेने 5 वर्षांची मुलगी आणि 18 महिन्याच्या मुलाला पाण्यात फेकले, स्वत:ही केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यात एका महिलेने आपल्या दोन्ही मुलांना पाण्याच्या कुंडात फेकून स्वत: कुंडात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह कुंडातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

हनुमानगढ जिल्ह्यातील बिरकाली परिसरात राहणाऱ्या हुसैना (26) या महिलेने मुलगी सिमरन (5) आणि विशाल (18 महिने) यांना पाण्याच्या कुंडात ढकलले. त्यानंतर स्वत: पाण्याच्या कुंडात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तीनही मृतदेह कुंडातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवले आहेत.

या घटनेबाबत पोलीस उपअधीक्षक रघुवीर सिंह यांनी सांगितले की, हुसैनाचे लग्न 7 वर्षांपूर्वी विकास खां नावाच्या एका व्यक्तिसोबत झाले होते. त्यानंतर तिला दोन मुले झाली. हुसैना आणि विकास या दोघांचीही वारंवार भांडणे होत असत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या घरगुती भांडणांमुळ हुसैनाने आत्महत्येचे पाऊल उचलले, अशी माहिती देण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.