
सामना प्रतिनिधी । नागपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील किन्ही गावात शुक्रवारी पट्टेदार वाघाने शेतकऱ्यास जखमी केल्याच्या घटना ताजी असताना रविवारी दुपारी सिंदेवाहीपासून अवघ्या ४ किमी अंतरावरील लाडबोरी शेतशिवारात काम करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. अनुबाई ऊर्फ वनिता आनंदराव चौके (५५, रा. लाडबोरी) असे मृत महिलेचे नाव आहे. सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू होण्याची ही सहावी घटना आहे.
सिंदेवाही तालुक्यात पट्टेदार वाघाने कमालीची दहशत माजवली आहे. सिंदेवाही-नवरगाव मार्गावरील सिंदेवाहीपासून अवघ्या चार किमी अंतरावर लाडबोरी शेतशिवारात रविवारी तीन ते चार महिला मातीकाम करीत होत्या. दुपारनंतर २.३० ते ३ वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असतानाच दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलांवर झडप घातली. या हल्ल्यात अनुबाई जागीच ठार झाली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सोबत असलेल्या महिलांनी घाबरून आरडाओरड करीत गावाकडे धाव घेतली. गावात येऊन गावकºयांना माहिती दिल्यानंतर गावकरी लाठ्या-काठ्या घेऊन शेतशिवाराकडे गेले. यावेळी महिलेचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. घटनास्थळापासून एक किमी अंतरापर्यंत त्या महिलेला वाघाने फरफटत नेल्याचेही निदर्शनास आले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभाग आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही येथील रुग्णालयात नेले.


























































