मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ भेटीला येत नसल्याने महिलांचा आक्रोश; उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी गावातील सुमारे 38 महिला तसेच पुरुष आमरण उपोषणाला बसले आहेत. मुंबईत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्र्याकडून आरक्षणाच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी एक शिष्टमंडळ येणार होते. मात्र 4 दिवसांत 7 आंदोलकांची तब्येत खालावली असतानाही शिष्टमंडळ चर्चेला येत नसल्याने आमची माणसे मेल्यावर चर्चेसाठी शिष्टमंडळ येणार का, असा सवाल संतप्त आंदोलक महिलांकडून सरकारला विचारण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे जाणुन-बुजून वडीकाळ्या गावातील मराठ्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवत आहेत. मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईवरून चर्चेसाठी येणार होते. ते अद्याप आले नसल्याने उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात पाठवून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दररोज आश्वासने दिली जात आहेत. मात्र, आता उपोषणाच्या चौथ्या दिवशीपर्यंत 7 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यातील 4 उपोषणकर्त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित 3 उपोषणकर्त्यांनी जागेवरून हलणार नाही या ठिकाणीच उपचार घेऊ अशी ठाम भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ 3-4 उपोषणकर्ते मेल्यावर वडीकाळ्या गावात येणार का, असा संतप्त सवाल महिला आंदोलकांनी केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे वडीकाळ्या गावातील मराठा आंदोलनाचा द्वेष करत आहेत. 2 दिवसांत मराठा आरक्षणावर तोडगा निघायला हवा. दिवसेंदिवस आंदोलकांची तब्येत बिघडत चालली आहे. आमचे आंदोलक मेल्यावर तुम्ही आमच्यासोबत चर्चा करून आम्हाला आरक्षण देणार का, असा संतप्त सवाल उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

वडिकाळ्या येथे एकूण 38 महिला तसेच पुरुष मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. 7 आंदोलकांची तब्येत बिघडली आहे. त्यातील चिंताजनक प्रकृती असलेल्या काशिनाथ मोताळे, राहिबाई पवार, शरद रक्ताटे, ताराचंद काथवटे या उपोषणकर्त्यांना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले असून सरकारच्या विरोधात आंदोलक तसेच उपोषणकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.