‘तेजस’मध्ये अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई – अहमदाबाद ‘तेजस एक्स्प्रेस’मध्ये आयआरसीटीसीने रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. प्रवासाला सुरुवात होताच महिला प्रवाशांचे लेडी ट्रेन कॅप्टन श्रीमती प्रभजोत यांनी पुष्पगुच्छ आणि चॉकलेट्स देऊन स्वागत केले. प्रवासादरम्यान ‘तेजस एक्स्प्रेस’च्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही दिशेच्या प्रवासात प्रत्येक कोचमध्ये ‘क्विझ’ स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजयी महिला प्रवाशांना पर्यावरण अनुकूलित ‘जूट स्लिंग बॅग’ भेट दिल्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तेजस एक्स्प्रेसमध्ये क्विझ स्पर्धेत योग्य उत्तरे देऊन निवड झालेल्या महिलांना ब्रँडेड सौंदर्य प्रसाधने भेट देण्यात आली.

गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील समृद्ध परंपरा, संस्कृती, उद्योग आणि ऐतिहासिक बाबींविषयी विशेष प्रश्न विचारण्यात आले. ‘महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो. तरीही प्रत्येक परिस्थितीतून त्या विजयी हाऊन त्या बाहेर येतात. आयआरसीटीसी कुटुंब आणि समाज एकत्रित करणाऱ्या या महिला शक्तीला सलाम करते, असे आय‌आरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी म्हटले आहे. त्यासाठी तेजसमध्ये अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.