
आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर करुन घेतले आहे. लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणूक लागण्याआधी या आरक्षणाची अंमलबजावणी होणं शक्य नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महिला आरक्षण हे जुमला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी पाच दिवस सर्व कामं सोडून आम्ही दिल्लीत गेलो होतो. आम्ही खूप उत्साहाने गेलो होतो. पहिल्या दिवशी जुन्या इमारतीला बाय बाय केले, दुसऱ्या दिवशी नव्या इमारतीचे वेलकम झाले. तिसऱ्या दिवशी महिला विधेयक मांडले गेले. आम्हाला आनंद वाटला. चांगल्या कामाला चांगले म्हटलेच पाहिजे. त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद असले तरीही वैयक्तिक मतभेद नाहीत, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
संसदेत माझ्या शेजारी मनिष तिवारी बसले होते. आम्ही टाळ्या वाजवत असताना मनिष तिवारी मोठ-मोठ्याने हसू लागले. आम्ही म्हटले चांगले विधेयक मांडत आहेत, मग हसताय का? तर ते म्हणाले इथे या, हा आणखी एक जुमला आहे. जेव्हा आम्ही पाहिले तेव्हा लक्षात आले की क्लॉज 3 मध्ये लिहिले आहे की महिला आरक्षण होणार आहे, पण कधी होणार आहे तर देशात मतदारसंघाची नव्याने रचना झाल्यावर होणार आहे. 2027 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे, असे त्या म्हणाल्या. यावरून महिला आरक्षण विधेयक हे जुमला असल्याचे त्या म्हणाल्या. पहिली जनगणना होईल, मग मतदारसंघाची पुनर्रचना होईल. त्यानंतर महिला विधेयकाची अंमलबजावणी होईल. म्हणजे काय तर चेकवर नाव लिहिलंय, अमाऊंट टाकली आहे पण तारीख लिहिलेली नाही. त्यामुळे हे सगळं महिला विधेयक मोठा जुमला आहे, असे त्यांनी सप्ष्ट केले.
पाच दिवस आम्हाला बोलावून खटाटोप केला. एका दिवसाच्या अधिवेशनासाठी पाच कोटी लागतात म्हणजे पंचवीस कोटी रुपये त्यांनी त्यांची हौस म्हणून, त्यांच्या जुमलेबाजीसाठी वाया घालवले आहेत. महिला आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात एका वर्षांत झाली होती. पण यांची अंमलबजावणी करायला दहा वर्षे लागणार आहेत. याचा अर्थ 2024 मध्ये आपल्या पदरात काहीही पडणार नाही. त्यामुळे ही पूर्ण जुमलेबाजी आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. या चर्चांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांचा उल्लेख न करता त्यांना टोलाल लगावला आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मला आनंद होतो. आसामचा संपूर्ण भाग ते कंट्रोल करतात. हेमंत बिस्वा सरमा (आसामचे मुख्यमंत्री) यांना भेटल्यावर मी नेहमी त्यांना थंम्प्स अप करते. मला सगळे म्हणतात तुम्ही त्यांना भेटल्यावर एवढं चिअरअप का करतात? कारण ते मुळचे काँग्रेसचेच आहेत. आता त्यांनी नॉर्थ इस्ट भाजपासाठी मोठं केलं असलं तरीही ते मुळचे काँग्रेसचे आहेत. त्यांच्याकडे (भाजपाकडे) कोणी टॅलेंट नाहीय, म्हणून त्यांना बाहेरून माणसं घ्यावी लागतात. पण आपला विचार तिथे जातोय हे चांगलंच आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
बाकीचेही हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव घेत आहेत, यातच आपलं यश आहे. यशवंतरावांचं नाव घेणं 25 टक्के लोकांनी सुरू केलंय. उरलेल्या 75 टक्के लोकांनी सुरू करायचं बाकी आहे. त्यांच्याही हे लक्षात आलंय की हेडगेवारांचं नाव घेऊन मतं मिळत नाहीत. ट्रिपल इंजिन सरकारमधील तिघांबाबत मी बोलतेय. याही सरकारमध्ये चव्हाणांचा फोटो मोठा होतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेह त्या म्हणाल्या.































































