लष्करात प्रथमच वर्क फ्रॉम होम, जवानांच्या सुट्टय़ा 15 एप्रिलपर्यंत वाढवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची महामारी थेट लष्करापर्यंतही पोहोचली आहे. लष्कराचा एक जवान संक्रमित आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराच्या इतिहासात प्रथमच वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेण्यात आला आहे. 23 मार्चपासून लष्कराचे 35 टक्के अधिकारी व 50 टक्के ज्युनियर कमिशन्ड अधिकारी एक आठवडा घरूनच काम करणार आहेत. लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी ही माहिती दिली.

लष्करातील एका जवानाला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या उच्चस्तरीय बैठकीत वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला. लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनीच ही माहिती दिली. होम आयसोलेशनचा पहिला टप्पा 23 मार्च रोजी सुरू होणार असून 35 टक्के अधिकारी व 50 टक्के जेसीओ एक आठवडा घरूनच कामकाज सांभाळणार आहेत. त्यानंतर 30 मार्च रोजी दुसऱया टप्प्यातील अधिकारी होम आयसोलेशनमध्ये जाणार आहेत. आयसोलेशनमध्ये असलेले अधिकारी एक दुसऱयांना भेटणार नाहीत तसेच त्यांच्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संपर्क असेल, असेही नरवणे यांनी स्पष्ट केले.

लष्कराच्या मुख्यालयातही अधिकारी व कर्मचाऱयांची संख्या घटवण्यात येणार आहे. 23 मार्चपासून केवळ अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारीच मुख्यालयात येणार असल्याचे लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी सांगितले. लष्कराने बदल्या व नियुक्त्यांवरही बंदी घातली आहे. सर्व पदांच्या अस्थायी नियुक्त्या 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या असून त्यांची तत्काळ फेररचना करण्यात आली आहे, असे नरवणे म्हणाले. अगोदरच सुट्टीवर गेलेल्या जवानांची सुट्टी वाढवण्यात आली असून त्यांना 15 एप्रिलपर्यंत घरीच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. लष्कराने 15 एप्रिलपर्यंत आपल्या अधिकाऱयांच्या परदेश दौऱयांवरही बंदी घातली असून सर्व प्रकारच्या परिषदा, सेमिनार टाळण्यात आले आहेत.a