
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पावसाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत तीन लढती एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आल्या आहेत, तर एक लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे. गुरुवारी टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. इंग्लंडमधील पाऊस वर्ल्डकपसाठी मोठी समस्या बनला आहे. चाहतेही निराश झाले आहेत. सामना रद्द झाल्यामुळे चाहत्यांना आर्थिक तोटाही होत आहे.
वर्ल्डकपसाठी जगभरातील चाहते इंग्लंडमध्ये जमले आहेत. अनेकांनी यासाठी मोठा पैसा खर्च केला आहे. चार वर्षातून एकदा येणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा पावसामुळे मात्र हिरमोड होत आहे. वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जात असल्याने चाहते नाराज आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का सामना रद्द झाल्यास तिकिटाचे किती पैसे प्रेक्षकांना परत मिळतात?
आयसीसीच्या नियमानुसार, सामना काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही तर चाहत्यांना पैसे परत देण्याचे काही नियम आहेत. सामना किती षटकांचा होतो यावरून प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मिळतात. वर्ल्डकपच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, सामना जर 15 षटक किंवा त्याआधी थांबवण्यात आला तर प्रेक्षकांना संपूर्ण पैसे परत दिले जातात. तसेच 15 ते 30 षटकांदरम्यान पाऊस आला आणि सामना रद्द करावा लागला तर प्रेक्षकांना तिकिटाच्या 50 टक्के रक्कम पर दिली जाते. परंतु 30 षटकांपेक्षा जास्त सामना खेळवला गेला आणि काही कारणास्तव रद्द झाल्यास प्रेक्षकाला एकही रुपयाही परत दिला जात नाही. तसेच रिफंडचे पैसे सामना रद्द झाल्यापासून 28 दिवसांच्या आत प्रेक्षकांना देणे बंधनकारक आहे.

























































