
सामना ऑनलाईन, ट्रेंट ब्रिज
हिंदुस्थानचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठय़ाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो यापुढे विश्वचषक सामन्यांत खेळणार की नाही याबद्दल साशंकता आहे. जायबंदी शिखर जर पूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नसेल तर संघात रिषभ पंतला स्थान देण्यात येऊ शकते. रिषभ पंत 16 जूनला मँचेस्टर येथे दाखल होणार आहे, पण पंतला मात्र हिंदुस्थानी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. कारण आयसीसीच्या नियमानुसार धवन पूर्ण विश्वचषक स्पर्धाच खेळू शकणार नसेल तरच संघाला बदली खेळाडू संघात घेण्याची परवानगी दिली जाऊ शकेल. अन्यथा नाही.
धवन 10-12 दिवसांत फिट होईल – संजय बांगर
‘आम्ही धवनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. ती लवकर बरी होईल अशी आम्हाला आशा आहे. धवन 10-12 दिवसांमध्ये फिट होईल असे आम्हाला वाटते’, असा विश्वास टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी गुरुवारी हिंदुस्थान-न्यूझीलंड लढतीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. राखीव खेळाडू रिषभ पंत मँचेस्टर येथे काही वेळात दाखल होणार आहे, असेही बांगर म्हणाले.




























































