राही, मनू, चिंकीला सुवर्ण पदक; विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सातव्या दिवशी हिंदुस्थानच्या महिलांनी 25 मीटर पिस्तोल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. चिंकी यादव, राही सरनोबत व मनू भाकर या त्रिकुटाने अंतिम फेरीत पोलंडच्या संघाचा 17-7 गुणफरकाने पाडाव करून हिंदुस्थानला सुवर्ण पदक जिंकून दिले.

चिंकीचे स्पर्धेतील हे दुसरे, तर मनूचे तिसरे सुवर्ण पदक होय. चिंकीने याआधी महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तोलमध्ये सोनेरी यश संपादन केले. मनूने 10 मीटर एअर पिस्तोल महिला सांघिक व 10 मीटर एअर पिस्तोल मिश्र प्रकारात सुवर्णवेध साधला होता. हिंदुस्थानने या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत आतापर्यंत 10 सुवर्ण, सहा रौप्य व पाच कास्य यांच्यासह एकूण 21 पदकांवर मोहोर उमटवली. हिंदुस्थान पदक तालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या महिला सांघिक प्रकारात हिंदुस्थानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.