
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 7 जूनपासून इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचा (डब्लूटीसी) अंतिम सामना रंगणार आहे. हिंदुस्थानात कसोटी सामने एसजी बॉलने खेळले जातात, तर ऑस्ट्रेलियात कुकाबुरा बॉल वापरला जातो, मात्र डब्लूटीसीची फायनल ही डय़ूक बॉलवर होणार आहे.
हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांत कसोटी सामन्यांत डय़ूक बॉल वापरला जात नसला तरी इंग्लंडमध्ये कसोटीसाठी हा बॉल वापरला जातो. जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेची फायनल इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे यजमान देशानुसार ‘डब्लूटीसी’च्या फायनलमध्ये डय़ूक बॉल वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड हा यजमान असल्याने हा सामना डय़ूक बॉलवर खेळविण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. ‘आयसीसी’च्या सूत्राने सांगितले की, आयसीसी सामन्यात यजमान देशाच्या मर्जीतील चेंडूचा वापर करते. त्यामुळे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये फक्त डय़ूक बॉल वापरला जाईल. याआधी 2021 मध्येही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला होता आणि तेव्हाही डय़ूक बॉलचाच वापर करण्यात आला होता. 2013 नंतर हिंदुस्थानी संघाला पहिली आयसीसी ट्रॉफी मिळवायची आहे.
वेगवान गोलंदाजांना सरावासाठी दिले डय़ूक बॉल
‘टीम इंडिया’चा कर्णधार रोहित शर्मा याने डय़ूक बॉलच्या तयारीबाबत अलीकडेच माहिती दिली. त्याने सांगितले की, आम्ही सर्व वेगवान गोलंदाजांना सरावासाठी आधीच डय़ूक बॉल पाठवले आहेत. 21 मे पर्यंत आयपीएल 2023 च्या प्ले ऑफसाठी 4 संघ ठरतील. अशा परिस्थितीत जे खेळाडू मोकळे असतील त्यांना लगेच इंग्लंडला पाठवले जाईल. तेथील वातावरणाशी जुळवून घेणे व डय़ूक बॉलवर तयारी करणे त्यामागील उद्देश आहे. ‘टीम इंडिया’च्या कसोटी संघात निवड झालेला चेतेश्वर पुजारा अजूनही इंग्लंडमध्येच काऊंटी क्रिकेट खेळत आहे. त्याचा फायदा नक्कीच संघाला होईल.
हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, के.एस. भरत, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलॅण्ड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स केरी, पॅमेरॉन ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेजलवूड, ट्रव्हिस हेड, जोस इंग्लिश, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.


























































