जोरदार पाऊस आला की धडकी भरते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

दरवर्षी जोरदार पाऊस सुरू झाला की धडकीच भरते. जसजसा पावसाचा जोर वाढेल तसतसे आमच्या बीआयटी चाळीत पाणी वाढत जाते आणि इमारत क्रमांक तीन आणि चार या इमारतींचा तळमजला पाण्याखाली जातो. चाळींच्या संडासातील पाणीही आमच्या घरात येते. प्रचंड दुर्गंधी आणि ड्रेनेजमधले पेâसाळते पाणी बादलीने बाहेर काढण्यातच आमचा सगळा दिवस जातो. या पाण्यामुळे दरवर्षी ताप, टायफॉइड, गॅस्ट्रो यांसारखे आजार तोंड वर काढतात. अशा अवस्थेत आम्हाला प्रत्येक पावसाळा काढावा लागतो, अशा शब्दांत परळच्या बीआयटी चाळीतल्या रहिवाशांनी आपबिती सांगितली. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हाला अशाच अवस्थेत पावसाळा काढावा लागत असल्याचे रहिवासी अमित गोळवणकर यांनी सांगितले.

दरवर्षी २५ ते ३० हजारांचे नुकसान
इमारत क्र. ३ मधील अमित गोळवणकर यांनी सांगितले की, गेले दोन-तीन दिवस रोज गुडघाभर पाणी साचत आहे. लोखंडी ग्रिलमधूनही पाणी आत येते. आमचा बेड आणि प्रâीज या पाण्यामुळे खराब झाल्याचे गोळवणकर यांनी सांगितले. अक्षय पठाडे यांनीही फ्रीज बिघडल्याचे सांगितले तर त्यांच्याच बाजूला राहणाऱ्या ऋतुजा मोरे यांची वॉशिंग मशीन बिघडली.

शत्रुंजय टॉवरमुळे आमचे मरण
या चाळींच्या जवळच शत्रुंजय नावाचा टॉवर उभा राहिला आहे. या टॉवरसाठी मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज पाईपलाईनचे जाळे बसवण्यात आले आहे. त्यामुळे आमचे मरण झाले आहे. आमच्या घरात मोरीतून आणि भिंतीतून संडासाचे पाणी येत असून पावसाळ्यात पाणी तुंबले की घरात दुर्गंधी पसरत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

fish-in-bit-chawl

ड्रेनेजच्या पाण्यातून वाहात आलेले मासेही आमच्या घरात शिरतात. पण,हे मासे घाणेरड्या पाण्यातले असल्याने आम्ही हे मासे खात नाही. पुन्हा पाण्यात सोडून देतो. मेलेले मासे फेकून देतो असे अलका जाधव यांनी सांगितले.