आयआयटीतील वसतिगृहातील जेवणात भेसळ नेहमीचीच, विद्यार्थिनींचा नव्या कॅटरर्सवर आरोप

सामना प्रतिनिधी, मुंबई

पवई येथील आयआयटी मुंबईच्या वसतिगृहातील जेवणातील दुधी हलवा खाल्ल्याने 25 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या प्रकरणानंतर तेथील स्वच्छतेचा मुद्दा चव्हाटय़ावर आला आहे. स्वच्छतेसाठी वसतिगृहातील कॅण्टीन दोन दिवस बंद केली गेली होती. पण अस्वच्छता ही आजचीच नव्हे तर नेहमीचीच आहे, असा विद्यार्थिनींचा आरोप आहे.

आयआयटीतील 10 नंबरच्या वसतिगृहात 1100 विद्यार्थिनी राहतात. विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर तेथील विद्यार्थिनींनी कॅटररवर आरोप केले आहेत. आयआयटी प्रशासनाने जरी 25 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची माहिती दिली असली तरी हा आकडा 50 वर असल्याचाही विद्यार्थिनींचा दावा आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर आयआयटीच्या हॉस्टेल कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात कॅण्टीनच्या कंत्राटदाराची भेट घेऊन त्याला तंबी दिली होती. त्यानंतरही विषबाधेचा प्रकार घडला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली जात असून तिच्या अहवालानंतरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्याने दिली.

  • गेल्या सप्टेंबरमध्ये या वसतिगृहातील जेवणात मुंग्या आढळल्या होत्या. तसेच पराठय़ामध्ये एका विद्यार्थिनीला प्लॅस्टिक पिशवीचा तुकडा आढळला होता. ऑक्टोबरमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली होती.
  • जेवणात किटक आणि भाजीमध्ये प्लॅस्टिक आढळले होते. त्याबद्दल कॅटररच्या कंत्राटदाराला दंड केला गेला.
  • जानेवारी महिन्यात पनीर शिळे असल्याचे आढळल्याने तातडीने त्याचा वापर थांबवला गेला.
  • फेब्रुवारीमध्ये मांसाहारी पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल खराब आढळले होते.

कॅटरर्सचे कंत्राट रद्द करा
गेल्या सोमवारी वसतिगृहाच्या सर्वसाधारण बैठकीत विद्यार्थिनींनी कॅटरर्सचे कंत्राट रद्द करा अशी मागणी केली होती. कॅटरर्सचे कंत्राट रद्दच झाले असून नवा कॅटरर मिळेपर्यंत त्याला कॅण्टीन चालवण्याची परवानगी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, 27 मार्चपर्यंत कॅण्टीन दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आली आहे. कॅण्टीनमधील कच्च्या मालामध्ये मुंग्या आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या, परंतु तयार जेवणात किटक, प्लॅस्टिक आढळल्याच्या घटनेबद्दल संस्थेला माहिती नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.