
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताना मला मनस्वी आनंद होत आहे. या क्षणी मला वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रकर्षाने आठवण होत आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुखांना जे जे अभिप्रेत होते तेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत आहे. आदरणीय उद्धवसाहेबांनी माझे नाव मंत्रिपदासाठी सुचविताना जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मीडियासोबत संवाद साधला.
देशापूढे आज अनेक समस्या आहेत, त्यातील एक महत्त्वाची समस्या आहे ‘बेरोजगारी’! माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या खात्यात अनेक कारखाने बंद आहेत किंवा आजारी आहेत. शिवसेनेची निर्मितीच मुळी भाकरीच्या लढ्यातून झाली. ‘उद्योग जगला तर कामगार जगेल’ हे वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे ब्रीदवाक्य आणि संस्कारही…! यासाठी रोजगारनिर्मिती करणारे उद्योग पुनर्जिवित करणे, पुनर्विकसित करणे, नवीन वाटा शोधणे, नव्या संकल्पना राबवणे व या सर्व मार्गांनी या संस्थांना पुन:श्च सक्षम करणे आवश्यक आहे. आमचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मनात देखील रोजगारनिर्मितीसाठी असलेली तळमळ मी जवळून पाहिली आहे, असेही ते म्हणाले.
आज हेच अवतारकार्य करण्याची संधी शिवसेना पक्षप्रमुखांनी मला दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे ते म्हणाले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचादेखील मी मन:पूर्वक आभारी आहे. नरेंद्र मोदी यांना अभिमान वाटेल असे काम माझ्या खात्यामार्फत करण्याचा मी शर्थीने प्रयत्न करेन, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.


























































