रिद्धिमान साहाचा बंगाल रणजी संघ सोडण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या मोसमाचे अवघे दोन सामने शिल्लक असून त्यानंतर रणजी सामन्यांना सुरुवात होणार आहे. रणजी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का बसला आहे. बंगालच्या रणजी संघातील वरिष्ठ यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा याने आगामी रणजी नॉकआऊट सामन्यांमध्ये संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

साहाने 2007 मध्ये बंगालच्या संघाकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 122 प्रथम श्रेणी आणि 102 लिस्ट ए खेळ खेळले, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 6 हजार 423 आणि 2 हजार 762 धावा केल्या.

रणजी ट्रॉफीच्या गट टप्प्यातील अव्वल क्रमांकावर असलेला बंगालचा संघ आता बाद फेरीत पोहोचला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनला या महत्त्वाच्या टप्प्यासाठी रिद्धिमान साहा बंगालच्या संघात हवा होता, मात्र तो रणजी नॉकआऊट सामने खेळण्यास तयार नसल्याचे त्याने सांगितल्याची माहिती बंगाल क्रिकेटचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

साहाची गुजरातला पसंती

सीएबीच्या अधिकाऱयाने राज्य रणजी संघाप्रतिच्या त्याच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर साहाने देशांतर्गत क्रिकेटमधून बंगाल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल क्वालिफायर सामन्यापूर्वी साहा म्हणाला होता, ‘मी येथे गुजरातचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे माझे घरचे मैदान मोटेरा स्टेडियम आहे. मी आता कोलकाता नाइट रायडर्ससोबत नाही. त्यामुळे ईडन गार्डन हे माझे घरचे मैदान नाही,’ असे साहा म्हणाला होता.

बालपणीच्या प्रशिक्षकांचेही ऐकले नाही

– बोर्डाने त्याचे बालपणीचे प्रशिक्षक जयंता भौमिक यांच्याशीही चर्चा केली, मात्र साहाने ऐकले नाही. त्यांनी सांगितले की, साहाने आता बंगालसाठी पुन्हा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्याने एनओसी मागितलेली नाही. मात्र जेव्हा तो एनओसी मागेल तेव्हा त्याला दिली जाईल, असे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.