बुक मॉलची बीजं चावडीवरच्या शाळेत रुजली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड… 2 रुपये भाडय़ाची खोली ते आजचे आनंदघन… प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर लेखणीची सोबत अखंड…

बैलगाडीनं 10 किलोमीटर अंतर कापलं की मुख्य रस्ता लागेल. इतक्या छोटय़ाशा खेडय़ात मातीच्या घरात आर्थिक विपन्नावस्थेत जन्माला आलेले बाबा भांड… चार-पाच एकर जमीन. घरात पाच-सहा माणसं. जून महिन्यात 25 रुपयांचं शालोपयोगी सामान घेतानाही पंचाईत व्हायची. शाळा मारुतीच्या मंदिरात. नंतर चावडीवर. तिसरीत मुलं कमी म्हणून वर्गच भरला नाही, पण बाबांची शिक्षणाची ओढ कमी झाली नाही. मावशीकडे पिंपरीला आले ते. पण मावशीचे यजमान शेतीची, गुरांना चारण्याची वगैरे भरपूर कामं सांगायचे. अभ्यासाला वेळच मिळायचा नाही. कसंबसं दीड वर्ष तिथे राहिले ते आणि मग ब्रह्मानंद मठात घेतली चार रुपये भाडय़ाची खोली. रूम पार्टनर मिळाला आणि प्रत्येकी दोन रुपयात व्यवस्था झाली. चुलीवर स्वयंपाक, शेणानं घर सारवणं अशी कामं करत शिक्षण सुरू राहिलं. अनेक कादंबऱया, कथासंग्रह, ललित गद्य, चरित्र, अनुवाद बालकथासंग्रह लिहीत सरस्वतीची पूजा बांधणारे आणि तिच्या आशीर्वादाच्या रूपानं साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे अनेक पुरस्कार मिळालेले बाबा भांड माझ्याशी जे बोलत होते, त्याच्याकरून खात्री पटत होती की असेल भले कोणी आयुष्य आखून ठेवलेलं, तरीही प्रचंड इच्छाशक्तीनं भरता येतात त्यात रंग आणि जगता येतं मनातलं.

त्यांच्यातल्या लेखकाच्या जन्माची कहाणी सांगताना ते म्हणाले, ’एखादे शिक्षक रजेवर असले की पुस्तकं दिली जायची वाचायला. आचार्य अत्रेंचं ’मी कसा झालो’ हे वाचलं आणि चाळीस पानी वही घेऊन मी कसा घडलो, काढलो ते लिहिलं. त्यात होतं गावातलं लहानपण, चिंचा, बोरं, घरातला कापूस विकून खाल्लेले गूळ शेंगदाणे वगैरे सगळंच. रॉकेलच्या दिव्याच्या साक्षीने केलेलं हे पहिलंवहिलं लिखाण. 10 वर्षांपूर्वी ही वही मुलीला सापडली आणि ती तशीच्या तशी ’वहीतलं बालपण’ नावानं प्रसिद्धही झाली.’ बाबांच्या आयुष्याला मिळालेला आकार, विचारांना आणि कृतीला मिळालेली दिशा, त्यांच्या जगण्याच्या प्रत्येक वळणाकर त्यांना भेटलेल्या शिक्षकांनीच दिली, हेही जाणवत होतं त्यांच्या बोलण्यातून. त्यांच्या लिखाणाची सुरुवात झाली ऑफ तासाच्या वाचनातून. जगप्रवास घडला स्काऊटच्या शिवलाल गावंडे सरांच्या मार्गदर्शनातून आणि लग्नाचा प्रस्ताव मांडण्यापासून, नोकरी सोडून मनासारखं काम कर, हे सांगण्यातही पुढाकार घेतला गेला मुख्याध्यापक काचोळे सरांकडून.

बाबांच्याच शब्दात सांगायचं तर, ’स्काऊटचे शिक्षक व्यायाम, खेळ घ्यायचेच, पण माझ्यातल्या लेखकाला त्यांनी सतत लिहितं ठेवलं. स्काऊट मेळाव्याच्या निमित्तानं मुंबई, अलाहाबाद, बनारस, दिल्ली असा प्रवास घडला. ते अनुभवही लिहिले. ग्रामीण भागातला पहिला बालवीर म्हणून निवडला गेलो. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक मिळालं. मॅट्रिकला मेरीटमध्ये आलो. चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती, अनुक्रमे पाच आणि दहा रुपये महिना होती. शिवाय मुख्याध्यापकांना एक किलोमीटर अंतरावरून दूध आणून देण्याचे दरमहा दहा रुपये मिळायचे. त्यात खर्च भागवत एवढं शिक्षण झालं खरं, पण संभाजीनगरला कॉलेजला जाण्याचं ठरलं, तेव्हा पुन्हा प्रश्न पडलाच, रहायचं कुठं? स्काऊट ऑफिसर वाघ साहेब म्हणाले, ’ऑफीसच्या वर चार पत्र्याची खोली आहे. ती मोफत देतो तुझ्यातल्या लेखकाला. पन्नास रुपये पगारावर ऑफिस झाडणं, पुसणं, पाणी भरणं, हिशेब ठेवणं वगैरे काम करत शिक्षण सुरू राहिलं. वाघ साहेबांना आठवडय़ातून दोन तीनदा वाचनालयातून पुस्तकं आणून द्यायचो. तेव्हा एक पुस्तक माझ्यासाठीही आणायला सांगायचे ते. त्यामुळे वाचनही सुरूच राहिलं. कॉलेजमध्ये कला विभागासाठी अर्ज केला तर मिळालेले गुण पाहून कमिटी सदस्य शंकरराक चव्हाण यांचे पुतणे भगवानराव म्हणाले, ’सायन्सला जा.. डॉक्टर, इंजिनीअर होशील.’ त्यावर मी म्हणालो, ’मला लेखकच व्हायचंय.’ प्राध्यापक होते भालचंद्र नेमाडे, इंग्रजी शिकवायला. त्यांची कोसला लगेचच वाचली. लेखन संस्कार आणि पुढे प्रकाशक होण्यासाठी प्रोत्साहन नेमाडे सरांनीच दिलं. झालं असं, स्काऊटच्या जागतिक मेळाव्यासाठी निवड झाली माझी. त्यामुळे कॅनडा, अमेरिका, जपान असा दहा देशांचा प्रवास केला. बैलगाडीतला पोरगा विमानानं निघाला म्हणून गावात वेणू आई मांगिणीनं ताटलीभर गूळ गावाला वाटला. परतल्यावर चार पत्र्याच्या घरात, कंदिलाच्या प्रकाशात, रात्री बारापर्यंत, तीन महिने लिहित होतो प्रकासवर्णन. त्याचं नाव सुचवलं नेमाडे सरांनी, ’लागेबांधे’. पुस्तक छपाईसाठी पाठय़पुस्तक प्रकाशकांनी पैसे मागितले. माझ्याकडे ते नव्हतेच. नेमाडे सर म्हणाले, ’पुढेमागे तूच हो प्रकाशक आणि सोडव कोंडी मुंबई-पुण्याबाहेरच्या लेखकांची. एकच कर, पुस्तक छपाईचे पैसे लेखकांकडे मागू नकोस, त्यांना मानधन दे आणि कराराप्रमाणे पैसे दे.. लग्नानंतर धारा आणि साकेत प्रकाशन संस्था सुरू केली तेव्हा हे नियम कटाक्षानं पाळले.’

बाबांच्या लग्नाची गोष्ट सुद्धा ऐकण्यासारखी आहे. ’बीए झाल्यावर मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत एमए झालो आणि आशा आयुष्यात आली. ती त्याच शाळेत शिक्षिका. तिचे कडील गंगाधरराव मोरे, सहकार क्षेत्रात प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिध्द. आर्थिक स्तरातल्या फरकामुळे आशाला मी आवडत असलो तरी लग्नाबद्दल विचारणं अवघड वाटत होतं मला. मग मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन तिच्या वडिलांकडे प्रस्ताव ठेवला लग्नाचा.’ आशाताईंशी लग्न झाल्यावर बाबांच्या आयुष्याला आशेचा बहरच आला. मी नोकरी करून घर चालवते, तुमचे पैसे तुमच्या प्रकाशनाच्या स्कप्नपूर्तीसाठी वापरा असं आशाताईंनी त्यांना सांगितलं. पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला पैसे हवेत म्हणून 10 रुपये ?अॅडव्हान्स बुकिंगची रक्कम गोळा करायला बाबा आणि त्या 200 बाय 250च्या घरांमध्ये फिरल्या. प्रकाशनानंतर पहिलं पुस्तक विकण्यासाठी बाबा सायकलीला पुस्तकांचा गठ्ठा बांधून फिरले. आठ शाळा फिरून झाल्यावर नवव्या शाळेत दोन पुस्तक विकली गेली तेव्हा मिळालेल्या वीस रुपयांचं, आशाताईंबरोबर त्यांनी जॉइंट अकाउंट उघडलं. प्रकाशनातून मिळणारा पैसा प्रकाशनातच कापरायला मग तिथूनच सुरुवात झाली. आजच्या घडीला 2000 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत.
फूड मॉलसारखी बुक मॉल ही एक वेगळीच संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे, जिथे त्यांच्या प्रकाशनाबरोबरच वेगवेगळ्या प्रकाशकांची दहा हजार पुस्तकं त्यांनी वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. संभाजीनगरपासून बारा किलोमीटरकर आनंदघन हे घर, शेजारीच त्यांनी सुरू केलेली 80 मूकबधिर मुलांची शाळा, समोरच अध्यक्षपदाचा भार असणारं योग केंद्र, यात बाबा रमतात सध्या. लिखाणात तर खंड नाहीचे, कारण तेच त्यांचं जगणं आहे.
बाबा भांड आणि माझी जन्मतारीख एकच. लेखकाच्या घरात या सदराचा शेवट करताना झालेल्या या योगायोगाची मला गंमत वाटली. हे सदर लिहिताना सातत्यानं सापडत होतं काही ना काही साधर्म्य प्रत्येक लेखकात आणि माझ्यात. विचारांचं… जाणिवाचं… किती सहजतेनं झाला प्रत्येकाशी मनमोकळा संवाद. अनुभवला आपुलकीचा अंतर्नाद. खूप काही शिकले, स्वत:ला तपासून पहात राहिले. प्रत्येककेळी जाणवलं, मी जोडलेली आहे या सगळ्या लेखकांशी एकाच नाळेनं. कारण प्रत्येकाच्या लिखाणाचं तंत्र जरी वेगळं असलं, त्या सरस्वतीचेच आहोत ना आम्ही सारे सुपुत्र…