
> शब्दांकन : राज चिंचणकर
लेखक, नाटककार व अभिनेते अभिराम भडकमकर सांगत आहेत, त्यांच्या जर्मन दिग्दर्शकाच्या हृदयस्पर्शी आठवणी…
फ्रिट्स बेनेविट्स हे जर्मनीतले एक खूप मोठे दिग्दर्शक आणि नाटय़शिक्षक. ‘एनएसडी’मध्ये आमचे नाटक बसवण्यासाठी ते आले होते. त्यांनी शेक्सपियरचे ‘ट्वेल्फ्ट नाईट’ हे नाटक निवडले होते. या नाटकात मला विदूषकाचा रोल होता. शेक्सपियरचा विदूषक करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे मी खूप आनंदात होतो. मी तयारी सुरू केली आणि पुढच्या काही दिवसांमध्ये काय घडले ते मला माहीत नाही, पण मला मलेरिया झाला आणि मी साधारणतः 20 ते 25 दिवस पलंगावर झोपून होतो. त्यामुळे अर्थातच त्या नाटकातली माझी भूमिका एका दुसऱया नटाकडे गेली. साहजिकच, या गोष्टीचे मला खूप वाईट वाटले.
काही दिवसांनी मी बरा होऊन ‘एनएसडी’मध्ये परत आलो, पण मधल्या काळात मला काय आवडते याची माहिती फ्रिट्स बेनेविट्स सरांनी माझ्या मित्रांकडून काढून घेतली होती. माझ्या मित्रांनी ‘‘अभिरामला गोड पदार्थ आवडतात,’’ असे त्यांना सांगितले होते. त्यांना हे कळल्यावर त्यांनी एक किलो लाडू विकत घेतले. त्या सगळय़ा लाडूंचा मिळून मोदकासारखा प्रचंड मोठा लाडू तयार केला. त्यासाठी त्यांनी स्वतः एक बॉक्स तयार केला. जेव्हा मी बरा होऊन वर्गात आलो, तेव्हा त्यांनी माझ्यासमोर ‘‘वेलकम अभिराम’’ असे म्हणत तो बॉक्स ठेवला. बॉक्स उघडल्यावर खूप भरून आले. एक शिक्षक जो केवळ महिन्याभरासाठी तुमच्याबरोबर काम करायला आलेला आहे, तो तुमच्यावर इतक्या वेगळय़ा पद्धतीने प्रेम करतो, इतक्या वेगळय़ा पद्धतीने तो तुम्हाला आदर देतो हे पाहून अक्षरशः त्या दिवशी माझ्या डोळय़ांत पाणी आले.
फ्रिट्स बेनेविट्स हा माणूस अत्यंत हळवा आणि भावुक आहे, हे मला अजून एका वेगळय़ा प्रसंगातून लक्षात आले. जेव्हा जर्मनीचे एकीकरण झाले आणि ती बर्लिनची भिंत पडली किंवा पाडली गेली, त्यावेळी अनेक लोकांनी त्या भिंतीचे छोटे छोटे दगड घरी नेले. त्यावेळी सोशल मीडिया वगैरे नव्हता. पत्रे आणि वर्तमानपत्रे हीच त्याकाळी संपर्काची माध्यमे होती. सरांच्या नातेवाईकांनी त्या भिंतीच्या घटनेच्या काळातली पेपर्सची कात्रणे आणि फोटो त्यांना पाठवले. त्यांच्याकडे त्यांच्या नावाचा तो लिफाफा आल्यानंतर त्यांनी तो घाईघाईने उघडला. त्यांनी ते फोटो पाहिले आणि त्यांच्या डोळय़ांतून घळाघळा पाणी वाहायला लागले. ते म्हणाले की, ‘‘आता जर्मनीचे एकीकरण झाले, आम्ही एक झालो.’’ साधारणतः वयाची साठी उलटलेला हा माणूस आपला दुभंगलेला, फाळणी झालेला देश एक झाला म्हणून इतका गहिवरत होता आणि इतक्या वेळेला तो त्या फोटोंचे चुंबन घेत होता की, ते पाहून मला खूप भरून आले.
माझ्या लक्षात आले की, कलावंत म्हणून माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्यातल्या भावभावना या खूप महत्त्वाच्या असतात. तो भावुक होतो, हळवा होतो आणि कितीही झाले तरी राष्ट्र ही कल्पना आपलेपणाची असते. आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत ही एक भावना आपल्या मनामध्ये ती निर्माण करते. असा तो जर्मन दिग्दर्शक आपले राष्ट्र आता पुन्हा एक झाले या भावनेने इतका सुखावून गेला होता, इतका आनंदी झाला होता की, मला ते दृश्य आजही माझ्या डोळय़ांसमोर दिसते. देशभक्ती काही वेगळी नसते. तुम्हाला तुमच्या देशाबद्दल वाटणारा आपलेपणा असा वेगवेगळय़ा पद्धतीने जेव्हा बाहेर येतो ते मला खूप हृद्य वाटते.
एका अपघातात एक डोळा गेलेला, संपूर्ण चेहऱयाची प्लॅस्टिक सर्जरी झालेली आहे, असा अत्यंत छोटासा म्हातारा माणूस, पण इतक्या आनंदाने त्याच्या त्या एका निर्जीव डोळय़ातून आणि एका सजीव डोळय़ातून जो आनंद वाहत होता, तो पाहताना मला खरेच भरून आले. अत्यंत हृद्य असा हा प्रसंग माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा प्रसंग आहे. फ्रिट्स बेनेविट्स यांचे माझ्या आयुष्यातले स्थानही तसेच आहे, पण अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून जी एक भावुकता मी त्यांच्या मनात उमटलेली पाहिली ती मला खूप हळवी करून गेली. सरांचे ते पाणावलेले डोळे आठवले की, आजही मी नकळत माझे डोळे पुसू लागतो.


























































