
आपला पक्ष वाढू नये, जनतेचा मनात संभ्रम निर्माण व्हावा, यासाठी जाणूनबुजून काही चर्चा घडवण्यात येत आहेत. मात्र, आता मनात कोणतीही शंका ठेऊ नका, आम्ही कधीही एक होणार नाही, अशी शपथ आपण घेण्याची गरज आहे. त्यांचे परतीचे दोर आपण कापले आहेत, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार गट यातील संबंधावर पक्षाची भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ते बोलत होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात. यात सगळंच आले. कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे सगळं लक्षात आले पाहिजे. त्यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेऊ नका. आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत. आपल्याला लढायचे आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा, त्यांची ताकद, जनतेच्या मनातील शरद पवारांचे आदराचं स्थान माझं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं भांडवल आहे. त्याच्या जोरावर आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत, याबाबत कोणतीही शंका नाही. आपणच सत्तेत येणार, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
आज प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे. थोडी कळ काढून, बघू काय होते ते, परत दोघे एकत्र होतील. आपण वेगळे नसून एकत्रच आहोत, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, त्यात काहीही तथ्य नसून आपला पक्ष वाढू नये, यासाठी केलेली ती ट्रिक आहे. कार्यकर्त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे. दोन्ही गट एकत्र आले तर डोक्याला ताप नको, अशी शंका सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे याबाबत कुजबूज होत असते. मात्र, आपण त्यात अडकण्याची गरज नाही. आपले अध्यक्ष स्वतः यात लक्ष घालत आहेत. आपल्या पक्षासाठी ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात, यातच सर्व आले आहे,असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
बऱ्याच जणांना अशी शंका आहे की, हे दोन्ही गट परत एकत्र आले, तर कशाला डोक्याला त्रास. अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की, आम्ही एक होणार नाही. सगळ्यांना ही शंका असल्याने कशाला घाई, कळ काढा, असं कार्यकर्ते एकमेकांना म्हणतात. एक महिला कार्यकर्ती दुसरीला म्हणते की, तुला काही कळतं का, ते आतून एकच आहेत. मी महिला कार्यकर्त्यांच्या मनातील बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तसे काहीही होणार नाही. आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ही शक्कल आहे. आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबुज केली जात आहे. मात्र, त्याकडे लक्ष न देता आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे, असे पाटील म्हणाले.


























































