
बालाघाटच्या डोंगरावर वसलेल्या येरमाळा येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सुरुवात शनिवारपासून होणार असून मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम रविवारी होणार आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकासह राज्यातील भाविकांनी हा परिसर फुलुन गेला आहे. या यात्रेसाठी लाखोंचा जनसागर बालाघाटमध्ये दाखल झाला असून ‘आई राजा उदे उदे’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला आहे.
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा 16 ते 21 एप्रिलदरम्यान पाच दिवस भरणार असून चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून लाखोंचा जनसागर यात्रेसाठी येत असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांनी यात्रेमधे वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी बाह्यवळण रस्त्यांचे व्यवस्थीत नियोजन केले आहे.
शनिवारी चैत्र पौर्णिमेला देवीच्या चैत्र पोर्णिमा महापूजा छबिना कार्यक्रम देवीच्या मुख्य मंदिरात रात्री 10 वाजता होणार आहे. रविवारी रोजी यात्रेच्या मुख्य चुना वेचण्याचा रविवारी सकाळी 8 वाजता होईल, त्यानंतर देवीच्या पालखीचे आमराई मंदिराकडे प्रस्थान होईल. मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम देवीच्या पालखीचे आगमन सकाळी 10 वाजता चुन्याच्या रानात आल्यानंतर होणार आहे. 11 वाजता पालखी आमराई मंदिरात दाखल होईल.पालखी आमराई मंदिरात पाच दिवस असते.
सोमवारी पशुप्रदर्शन होणार आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजता कुस्त्यांची दंगल तर रात्री 9 वाजता आराधी मंडळांच्या आराधी गायनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी रात्री 9 वाजता विठ्ठलरुक्मिणी मंदिरातून शोभेच्या दारूच्या अतिषबाजीची मिरवणूक निघून आमराई मंदिर परिसरात शोभेच्या दारूच्या अतिषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी दुपारी 4वाजता देवीच्या पालखीची महापूजेनंतर घुगरी महाप्रसादाचे वाटप झाल्यानंतर पालखीचे डोंगरावरील मुख्य मंदिराकडे वाजत गाजत प्रयाण होणार आहे.
आरोग्य विभागाकडून भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देवीच्या मंदिर परिसरात 2 ,मंदिरात 1,आमराई मंदिर परिसरात 2 असे एकूण 5 आरोग्य बुथचे नियोजन करण्यात आले आहे. या कामी जिल्ह्यातील 40 कर्मचारी नेमणुकीपैकी 10 डॉक्टर,महिला डॉक्टर 10, आरोग्य सेवक – सेविका10, बहुउद्देशीय कर्मचारी, 5 शिपाई असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून यात्रा काळात पिण्याच्या पाण्याचे 25 टँकर, 1 अग्निशामक बंब, मंदिर मार्ग,गावात पथ दिवे पाणीपुरवठा कायम करण्याची तयारी केली आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन रांगेची एकेरी व्यवस्था,गर्दीत चोरीचे प्रकार टाळण्यासाठी मंदिर परिसर दत्त कल्लोळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दर्शन रांगेसाठी,पालखी सोहळा संरक्षणासाठी 75 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
मोठया प्रमाणात होणार बस वाहतूक
धाराशिव विभागाने 150 ,बीड 80,लातूर 50 तर बार्शी आगाराच्या 20,कुर्डुवाडी, करमाळा आगाराच्या प्रत्येकी 5 गाड्या यात्रेच्या व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना प्रवासासाठी करण्यात आलेले यात्राशेड व्यवस्था समजावी म्हणून मंदिर, आमराई, चुन्याचे रान, गावातील मुख्य रस्ते, चौका चौकात दिशादर्शक फलक लावले आहेत.






























































