येस बँक संकट : अनिल अंबानी चौकशीसाठी ईडीसमोर हजर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांच्यासह काही जणांवर दाखल करण्यात आलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या (पीएमएलए) चौकशीसाठी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी गुरुवारी सक्तवसूली संचालनासमोर (ईडी) हजर झाले. अंबानी सकाळी 9.30 वाजता बलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाप्रकरणी ईडी अंबानी यांची चौकशी करणार आहे. अंबानी यांच्या मालकीच्या समूहातील 9 कंपन्यांनी येस बँकेकडून 12,800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्यात आली होती.

अनिल अंबानी यांचा रिलायन्स समूह, एस्सेल, आयआलएफएल, डीएचएफएल आणि वोडाफोन यांना कर्ज दिल्यामुळेच येस बँक अडचणीत आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते. अंबानी यांना ईडीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वैयक्तिक कारणाने त्यांनी हजर राहण्यासाठी सूट मागितली होती. मात्र, ईडीने त्यांना पुन्हा समन्स पाठवून गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्या समन्सनुसार अंबानी ईडीसमोर हजर झाले होते. या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादले होते. आता तपास यंत्रणेने राणा कपूर, त्यांचे कटुंबिय आणि संबधितांवर कारवाईला सुरुवात केली आहे. येस बँकेचे प्रवर्तक कपूर आणि त्यांच्या कटुंबियांनी मोठी कर्जे देत लाभ मिळवण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या चौकशीसाठी अंबानी यांना ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते.

येस बँकेकडून रिलायन्स समूहाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नियमानुसार कर्ज घेतले होते, असे समूहाने स्पष्ट केले होते. रिलासन्स समूह आपल्या मालमत्तेची विक्री करून येस बँकेचे कर्ज फेडणार असल्याचेही समूहाने म्हटले होते. तसेच राणा कपूर, त्यांचे कुटुंबिय यांच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेशी समूहाचा संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अनिल अंबानी चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले असले तरी एस्सेल समूहाचे प्रवर्तक सुभाष चंद्रा यांनी संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने चौकशीसाठी हजर राहणे शक्य नसल्याचे कळवले आहे. ते खासदार आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाचे कारण सांगत चौकशीसाठी हजर नव्हते.