HAPPY HOLI – YES BANK ग्राहकांवरील 50 हजारांची मर्यादा शनिवारपर्यंत हटण्याची शक्यता

728

देशभरात शिमगा आणि धुळवड (HOLI) उत्साहात साजरी केली जात असताना या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. YES BANK मध्ये खाती असणाऱ्यांना शनिवारपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या खातेधारकांवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये काढण्याचे निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध शनिवारपर्यंत हटण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेवर प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. ग्राहकांसाठी सगळ्या सेवा पुन्हा बहाल करण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्न करत असल्याचं कुमार यांनी सोमवारी सांगितले. ग्राहकांचा सगळा पैसा सुरक्षित असल्याचं आश्वासन देतानाच त्यांनी या आठवड्याच्या शेवटापर्यंत बँकेतून रक्कम काढण्यावर घातलेले निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात असं सांगितलं. लवकरच ग्राहक पूर्वीप्रमाणे या बँकेच्या सगळ्या सुविधांचा फायदा उचलू शकतील असंही त्यांनी सांगितलं.

येस बँकेचं नियंत्रण स्टेट बँकेच्या हातात गेल्याने बँकेला भेडसावणारी चलन तरलतेची समस्या दूर झाली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. असं असतानाही ग्राहकांना पैसे काढण्यासाठी निर्बंध घालण्यात आले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळेच रिझर्व्ह बँक लवकरात लवकर पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध मागे घेण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेने गेल्या गुरुवारी ग्राहकांसाठी या बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते.  3 एप्रिलपर्यंत ग्राहक 50 हजार रुपयेच काढू शकतील असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं होतं. RBI ने येस बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांना प्रशासक म्हणून नेमलं होतं.

YES BANK च्या पुनर्गठनाचा आराखडा मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. रिझर्व्ह बँक या आराखड्याला अंतिम स्वरुप देणार आहे. या आराखड्याबाबत आलेल्या लोकांच्या सूचना ऐकून त्यातील चांगल्या सूचनांचाही यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील 26 टक्के हिस्सा आपल्या हातात यावा यासाठी 6 हजार कोटींची गुंतवणूक करू शकेल. इतकीच जागतिक गुंतवणूकदारांकडूनही अपेक्षित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या