
सामना प्रतिनिधी, पूर्णा
एका २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार, २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेची माहिती निळा येथिल पोलीस पाटील पंडीत बुद्धे यांनी पोलिसांना दिली.
तालुक्यातील निळा येथिल तरुण शेतकरी गोविंद शिवाजी सूर्यवंशी (२७) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्याकडे ५ एकर शेती आहे. घरी आई-वडील, पत्नी व एक मुलगी असून गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळाने सततची नापिकी, पडलेला बाजारभाव व पूर्णा येथील स्टेट बँक शाखेचे त्यांच्यावर असलेल्या दीड लाख रुपयांच्या कर्जाला कंटाळून गोविंद याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

























































