नोकरी मिळवण्यासाठी लावले मोठे होर्डिंग; प्रसिद्धी तर मिळाली,नोकरीची अजूनही प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. तर अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत.नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण विविध युक्ती वापरत आहेत. मात्र, अशीच एक कल्पना एका तरुणाच्या अंगलट आली आहे. त्याने वापरलेल्या भन्नाट कल्पनेमुळे त्याला प्रसिद्धी तर चांगलीच मिळाली. मात्र, आपण अजूनही नोकरीच्या शोधात असल्याचे तरुणाने सांगितले.

नोकरीसाठी आपण अनेकठिकाणी अर्ज केले होते. एका आठवड्यात तब्बल 300 ठिकाणी आपल्याला नोकरीसाठी नकार देण्यात आला. त्यामुळे आपण निराश झाल्याचे तरुणाने सांगितले. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वेगळाच मार्ग निवडण्याचा निर्णय या तरुणाने घेतला. या तरुणाने नोकरी मिळवण्यासाठी शहरात मोठे होर्डिंग्ज लावले. या होर्डिंग्जमुळे त्याला प्रसिद्धी तर चांगलीच मिळाली. मात्र, अजूनही तो नोकरीच्या शोधातच आहे. फक्त होर्डिंग्जसाठी आपले पैसे खर्च झाल्याची खंत त्याने व्यक्त केली. साठवून ठेवलेले पैसेही खर्च झाले आणि नोकरीही मिळाली नाही. फक्त प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीने नोकरी मिळत नसल्याचे त्याने सांगितले.

आयर्लंडमध्ये ही घटना घडली आहे. क्रिस हार्किन हा 24 वर्षांचा तरुण सप्टेंबर 2019 पासून नोकरीच्या शोधात आहे. त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्जही केले आहेत. एकाच आठवड्यात तब्बल 300 ठिकाणी अर्ज करून सर्व ठिकाणी नकार मिळाल्याने तो निराश झाला होता. त्यामुळे अर्ज करून नोकरी मिळणार नाही. नोकरी मिळवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचे त्याने ठरवले.

आता शहरात मोक्याच्या ठिकाणी मोठे होर्डिंग्ज लावून नोकरी मिळवण्याची कल्पना त्याला सूचली. शहरात मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यासाठी त्याने तब्बल 40 हजार रुपये खर्च केले. ‘ द मिरर वेबसाईट’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या होर्डिंग्जवर त्याने लिहिले होते. Please Hire Me. त्यानंतर त्याखाली तीन ओळीत त्याने आपली माहिती दिली होती. आपण ग्रॅज्युऐट आहोत. अनुभवी रायटर आहोत. तसेच कंटेंट क्रियेटर असल्याची माहिती त्याने त्या तीन ओळीत दिली होती. त्याखाली त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलचे नाव दिले होते.

या होर्डिंग्जचे डिझाइन आणि ते लावण्यासाठी क्रिसने 40 हजार रुपये खर्च केले. एका आठवड्यात तब्बल 300 ठिकाणी नोकरीसाठी नकार मिळाल्यावर आपण निराश झालो होतो. याबाबत बहिणीशी बोलल्यावर तिने आपल्याला ही कल्पना सुचवली. ती सोशल मिडीया मॅनेजर आहे. असे वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केल्यास नोकरी मिळेल, असे तिने आपल्याला सांगितले.

बहिणीच्या सल्ल्याप्रमाणे आपण जून महिन्यात शहरातील मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावले. त्यासाठी तब्बल 40 हजार रुपये खर्च केले. शहरात होर्डिंग्ज लागल्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. आपल्या यूट्यूब चॅनेवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या. या होर्डिंग्जमुळे आपल्याला प्रसिद्धी तर मिळाली. मात्र, आपल्याला प्रसिद्धीऐवजी नोकरी हवी आहे, असे क्रिसने सांगितले. नोकरीसाठी एवढा खटाटोप आणि खर्च करुनही नोकरी मिळाली नसल्याचे त्याने सांगितले.