
मागील बऱयाच काळापासून मुंबई विद्यापीठाचा कारभार प्रभारी अधिकारीच चालवत असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठापाठोपाठ मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवडही अजून उशीर न करता तातडीने करावी, अशी मागणी युवासेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्यपाल बैस यांनी नुकतीच मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती जाहीर केली. त्याबद्दल युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी राज्यपालांचे अभिनंदन केले आहे. उशिरा का होईना, पण राज्यपालांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची आठवडय़ात होणारी निवड किमान 15 दिवसांनंतर करून विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीच्या मुलाखती संपन्न झाल्या. मागील बऱयाच काळापासून मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण कारभार प्रभारी अधिकारीच चालवत असल्यामुळे विद्यार्थी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. नुकतीच मुंबई विद्यापीठ कुलगुरू नियुक्तीकरिता मुलाखती पार पडल्या असून ही नियुक्ती कोणताही विलंब न करता त्वरित जाहीर करावी, अशी आग्रही मागणी युवासेनेच्या वतीने राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

























































