
सामना प्रतिनिधी । मुंबई
कॉम्प्युटर इंजिनियरींग अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर-6 मधील ‘डाटा वेअरहाऊसिंग ऍन्ड मायनिंग’ विषयाच्या पेपरचा पॅटर्न यंदा मुंबई विद्यापीठाने अचानक बदलला. त्यातील ऑप्लिकेशन बेस्ड प्रश्नांनी विद्यार्थी चक्रावून गेले. शिकवले गेले नाही तेच पेपरमध्ये विचारले गेले होते. पेपर कठीण गेल्याने सुमारे 18 हजार विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. त्यामुळे या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट ‘ग्रेस मार्क्स’ देण्यात यावे अशी मागणी युवासेनेने कुलगुरूंकडे केली.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून कुलगुरू सुहास पेडणेकर यांची नुकतीच युवासेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. गेल्यावर्षीपेक्षा ‘डाटा वेअरहाऊसिंग ऍन्ड मायनिंग’च्या पेपरमध्ये बराच बदल होता. पॅटर्न बदलताना विद्यार्थ्यांना त्याची कल्पनाही विद्यापीठाने दिली नव्हती. या पेपरमध्ये ज्या पध्दतीचे प्रश्न विचारले गेले होते त्यांची उत्तरे कशी लिहावीत याबद्दल शिक्षकांनी काहीच शिकवले नव्हते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
युवासेनेच्या शिष्टमंडळात सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, सुप्रिया करंडे, ऍड. वैभव थोरात, शीतल शेठ-देवरुखकर आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांचा समावेश होता अशी माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे. युवा सेनेच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन यावेळी कुलगुरूंनी दिले.


























































