नगरमधील 1800 शाळांचा कायापालट, जिल्हा परिषदेकडून ‘मिशन आपुलकी’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून ‘मिशन आपुलकी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून 15 वर्गखोल्यांच्या उभारणीसह 1800 शाळांना 13 कोटींचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध कंपन्यांकडून ‘सीएसआर’ फंडातून या शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

नगर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरविण्यासाठी निधीची नेहमीच अडचण भासते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्यात प्रथमच 1 मे 2022 रोजी जिल्हा परिषदेने ‘मिशन आपुलकी’ उपक्रम हाती घेतला होता. या अभियानातून 15 वर्गखोल्यांच्या उभारणीसह 1800 शाळांना 13 कोटींचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचा ‘नगर पॅटर्न’ राज्याला दिशादर्शक ठरत आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकाऱयांच्या कार्यकाळात 1 मे 2022पासून ‘मिशन आपुलकी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण अभियानाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी गती दिली. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, तसेच शिक्षण विभागातील समन्वयक रमेश कासार यांनी विविध कंपन्यांकडून ‘सीएसआर’ निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल केले. लोकांनी शाळांचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेत ‘मिशन आपुलकी’चे स्वागत केले. आतापर्यंत सुमारे दीड कोटीच्या निधीतून 15 वर्गखोल्यांची उभारणी झाली आहे.

‘मिशन आपुलकी’चा अर्थ

जिल्ह्यामध्ये शिक्षण घेऊन विविध पदांवर भरारी घेतलेल्या माजी विद्यार्थी, तसेच शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपुलकीच्या नात्याने शाळेला शैक्षणिक साहित्याची मदत करणे हा प्रमुख हेतू या उपक्रमामागे आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, कंपन्यांकडूनही आपुलकीच्या नात्याने जिल्हा परिषदेने मदतीचे आवाहन केले आहे.

शाळांचा कायापालट कसा झाला?

  • जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळांमध्ये आता संगणकासह एलईडी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह बोर्ड (डिजिटल फळे) 450 शाळांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.
  • 100 टक्के शाळांमध्ये वीजजोड देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर माहिती मागवून वीज बिलाची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच विजेसाठी इतर पर्यायही विचाराधीन आहेत. तसेच शाळांमध्ये शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर, संगणक आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. असा उपक्रम राबविणारी नगर ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरल्याचे प्रशासनाने सांगितले. जिह्यात सुमारे 800 वर्गखोल्या
  • उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्हा नियोजनचा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय पर्याय नाही.
  • ‘मिशन आपुलकी’तून जिह्यातील 150 शाळांवर सौरऊर्जा पॅनेल उभारणी करण्याचे नियोजन आहे. सौरऊर्जेतून वीज उपलब्ध होईल. त्याचबरोबर 100 टक्के शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड (डिजिटल फळे) उपलब्ध करून या शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने विविध संस्थांनाही पत्र देण्यात आले आहे.

– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, नगर.