झोमॅटोचा ग्राहकांना झटका, ऑर्डरवर पाच रुपये जास्त द्यावे लागणार

झोमॅटोने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये 25 टक्क्यांची वाढ केल्यामुळे आता ग्राहकांना यापुढे प्रत्येक ऑर्डरवर पाच रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कंपनीने तिमाहीची घोषणा करण्याआधीच शुल्कवाढीची घोषणा केली आहे. तसेच यापुढे आता झोमॅटोची इंटरसिटी लिजेंड्स फूड डिलीव्हरी सेवादेखील उपलब्ध होऊ शकणार नाही. ऑगस्ट 2023 मध्ये कंपनीने नफा कमावण्यासाठी प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतरपासून यात दोनदा वाढ करण्यात आली. झोमॅटो दरवर्षी जवळपास 85 ते 90 कोटी ऑर्डर घेते.

केवळ एक रुपया सुविधा शुल्क आकारल्याने कंपनीच्या उत्पन्नामध्ये 85 ते 90 कोटी रुपयांचा फरक पडतो. झोमॅटोने इंटररिटी लिजेंड्स सेवा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेअंतर्गत कंपनी एका शहरातील टॉप रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थ दुसऱया शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑर्डर स्वीकारायची. मात्र, सध्या ही सेवा थांबवण्यात आली आहे.