
सामना प्रतिनिधी । कल्याण
अन्यायकारक ‘ओपन लॅण्ड टॅक्स’ आकारणीच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकांनी आज कल्याण-डोंबिवली महापालिकेवर धडक मोर्चा काढला. जवळपास एक हजार बांधकाम व्यावसायिक, मजूर, कारागीर मोर्चात सहभागी झाले होते. बांधकाम व्यावसायिकांनी यावेळी प्रशासनाच्या बेदरकार कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. आंदोलकांची आक्रमकता पाहून आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत खुल्या जमिनीवरील कर कमी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून बांधकाम व्यावसायिकांना आकारण्यात येणारा ‘ओपन लॅण्ड टॅक्स’ हा आसपासच्या इतर महापालिकांच्या तुलनेत जास्त असल्याने महापालिका क्षेत्रातील बिल्डर वर्गात असंतोष आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने एमसीएचआय संघटनेच्या नेतृत्वाखाली आज पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. सहजानंद चौक येथून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी अडवला. यावेळी शिष्टमंडळाने आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत ‘ओपन लॅण्ड टॅक्स’ कमी करण्याची मागणी केली. यावेळी एमसीएचआयचे अध्यक्ष मनोज राय, उपाध्यक्ष रवी पाटील, प्रफुल्ल शहा, श्रीकांत शितोळे, विकास वीरकर, मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.





























































